Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेनी (Aurangabad Municipal Corporation) शहरातील महत्वाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान आज देखील महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जोरदार कारवाई करत, शहरातील चंपा चौक ते जीन्सी रेगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहे. धक्कादायक म्हणजे या रस्त्यांवर काही राजकीय पक्षांनी अतिक्रमण करत चक्क राजकीय कार्यालय थाटली होती. मात्र मनपा आयुक्त डॉ.  अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अखेर कारवाई करत एकूण 80 अतिक्रमण काढण्यात आले आहेत. 


महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शहरातील चंपा चौक ते जीन्सी रेगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात आले. औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने चंपा चौक ते जिन्सी या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या 80 फूट डीपी रस्त्यावर आज एकूण 80 अतिक्रमणे निष्काशीत करण्यात आली. या अतिक्रमणामध्ये नागरिकांनी रस्त्यावर कच्चे पक्के बांधकाम करून अतिक्रमणे केली होती. या अतिक्रमणामध्ये 15 बाय 15  ते दहा बाय पंधरा याचे सिमेंट विटा मातीमध्ये बांधकाम करून दुकाने थाटली होती. तर इतर काही व्यापाऱ्यांनी लोखंडी पत्र्यामध्ये टपऱ्या टाकून यामध्ये मटन चिकन, मोबाईल व्यापार, हॉटेल, चहा दुकान असा व्यवसाय करत होते. तर काहींनी राजकीय पक्षाचे कार्यालय उघडले होते. 


पंधरा दिवसांपूर्वीच देण्यात आली होती सूचना!


औरंगाबादच्या महानगरपालिकेने आज चंपा चौक ते जीन्सी रेगटीपुरा चौक डीपी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली आहे. मात्र या सर्व अतिक्रमणधारकांना पंधरा दिवसांपूर्वीच नियमानुसार सूचना देऊन, मार्किंग करण्यात आली होती. तसेच आपले अतिक्रमण, बांधकाम स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले होते. परंतु काही नागरिकांनी सदर जागा ही मंडळाची आहे. तर काहींनी न्यायालयमधून स्थगिती आणण्याचाही प्रयत्न केला. परंतु महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण असल्याने शेवटी ते काढण्यात आले. अतिक्रमण हटाव पथकाने प्रथम चंपा चौक येथील चंपा मस्जिद लगत असलेले दहा ते बारा अतिक्रमण जेसीबीची साह्याने निष्काशीत करणे सुरू केले. यामुळे इतर लोकांनाही स्वतःहून सदर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. नंतर  सायंकाळपर्यंत ही सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. 


यांनी केली कारवाई!


ही कारवाई प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे, पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पोलीस निरीक्षक फइम हाश्मी, इमारत निरीक्षक मझहर  अली, आर एम सुरासे, सय्यद जमशेद, पंडित गवळी, पोलीस  कर्मचारी, विद्युत विभाग कर्मचारी यांनी सर्वांनी कारवाई सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nilam Gorhe: महिलेचा विनयभंग करणाऱ्या 'एसीपी'ला निलंबित नव्हे बडतर्फ करा; नीलम गोऱ्हेंची मागणी