Marathwada Water Issues: पावसाळा सुरु होऊन तीन आठवडे उलटत चालले असतानाही मराठवाड्यातील  पाणी टंचाई अजूनही कायम आहे. मराठवाडा विभागातील विविध जिल्ह्यातील 647 गावांत आजही पाणीटंचाई असून 94  टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सोबतच 852 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर सर्वाधिक टँकर जालना जिल्ह्यात सुरु आहे. तर सर्वाधिक 294 विहिरी हिंगोली जिल्ह्यात अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. 


गेल्या तीन वर्षांपासून जून महिन्याच्या सुरवातीलाच दमदार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र यावर्षी अर्धा महिना उलटूनही दमदार असा पाऊस झाला नाही. तर काही भागात एकही  पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. तर टँकरच्या संख्येत सुद्धा दिवसेंदिवस वाढ होत आहे. 


कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती...


औरंगाबाद जिल्ह्यात आजघडीला 5 टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, 90 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यात 43 टँकर आणि 93 विहिरी, परभणी 1  टँकर आणि 29 विहिरी, हिंगोली 20  टँकर आणि 294 विहरी, नांदेड 16  टँकर आणि 164 विहिरी, बीड 8 टँकर आणि 161 विहिरी, लातूर जिल्ह्यात 17 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 4 विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. 


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस...


मराठवाड्यात 1 ते 15 जूनदरम्यान 45.50 मि.मी. पाऊस झाला आहे. यात औरंगाबादेत 50.8 मि.मी., जालना 40.5 मि.मी., बीड 49.1 मि.मी., लातूर 32.5 मि.मी., उस्मानाबाद 42.8 मि.मी., नांदेड 51.9 मि.मी., परभणी 47.8 मि.मी. आणि हिंगोलीत 41.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


भाजपकडून मोर्चे...


मराठवाड्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात भाजपकडून विविध जिल्ह्यात जल आक्रोश मोर्चे काढण्यात येत आहे. आधी औरंगाबाद आणि आता जालना जिल्ह्यात सुद्धा मोर्चा काढण्यात आला. तसेच ज्या जिल्ह्यात पाणी टंचाई तिथे भाजप अशी घोषणा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली. त्यामुळे यापुढे सुद्धा टंचाईग्रस्त जिल्ह्यात भाजपकडून मोर्चे काढले जाण्याची शक्यता आहे.