Jalna Steel IT Raid Aurangabad Connection: जालना शहरातील स्टील कारखानदारांच्या कारखाना आणि घर-कार्यालयावर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यात आता आणखी नवीन माहिती समोर आली असून, जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन समोर आले आहे. आयकर विभागाने याप्रकरणी औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले असल्याचे आता समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील कारखान्यातून बेहिशेबी मालमत्ता औरंगाबादमध्ये आली. औरंगाबाद येथील काही केटरर्स, बांधकाम व्यावसायिक यांनी तो पैसा व्यवहारत आणला आणि कर बुडवला. त्यामुळे हे सर्वजण आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं कळतंय. तसेच औरंगाबाद येथील तिघांवर सुद्धा आयकर विभागाने छापे टाकले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकंदरीत जालन्यातील 390 कोटींच्या घबाडाचं औरंगाबाद कनेक्शन समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पैसे मोजणारे अधिकारी पडले आजारी...
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधल्या ईडीच्या धाडीत सापडलेल्या नोटांचे ढिगार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा जालना शहारतील कारवाईने त्याची आठवण करून दिली आहे. तब्बल 390 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या कारवाईत समोर आली असल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईसाठी एकूण आठ दिवसांचा कालावधी लागला असून, दिवस-रात्र अशी 24 तास कारवाई सुरु होती. त्यामुळे कारवाई करणारे काही अधिकारी आजारी पडले असल्याचे सुद्धा समोर आले आहे. त्यामुळे ही किती मोठी कारवाई होती याचा यातून अदांज येऊ शकतो.
धाडीमागची फिल्मीस्टाईल रंजक कहाणी
जालन्यातील कारवाईबाबत आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. त्यातच या कारवाईची फिल्मीस्टाईल रंजक कहाणी समोर आली आहे. कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी या धाडीमध्ये वापरलेल्या गाड्यांवर लग्नामध्ये वापरल्या जाणारे स्टीकर वापरण्यात आले होते. तब्बल 400 लोकांच्या या पथकाने छापेमारीबाबत कमालीची गुप्तता बाळगली. नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवर जणू काही लग्नाला जात असल्याचे भासवत कारवर वरवधूच्या नावाचे स्टिकर लावले होते. काहींनी ‘दुल्हन हम ले जायेंगे’ असा मजकूर असलेले वेगवेगळे स्टिकर लावले होते. त्यामुळे या पथकावर कुणालाही संशय आला नाही.
महत्वाच्या बातम्या...