Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली असून, नराधमाकडून झालेल्या अत्याचारामुळे गर्भवती राहिलेल्या तरुणीने बदनामीच्या भीतीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. तर अत्याचार करणारा आरोपी पिडीत तरुणीच्या भावकीतीलच असल्याचे समोर आले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. भावकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने पिडीत मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील माळीसागज येथील संबंधित आरोपी तरुण आणि पिडीत तरुणी एकाच गावातील राहणारे आहेत. दोन्ही भावकीतील असल्याने त्यांची चांगली ओळख होती. नात्यातील असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणेही होते. दरम्यान 9 महिन्यांपूर्वी तरुणीची आई कामानिमित्त घराबाहेर गेलेली असताना तो तरुण तिच्या घरी गेला. त्यावेळी अल्पवयीन तरुणी घरात एकटीच होती. 


अत्याचार करत दिली धमकी...


घरी आलेला तरुण भावकीतील असल्याने घरात एकटी असलेल्या तरुणीने त्याला घरात घेतले. मात्र याचा गैरफायदा घेत त्याने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी पण दिली. घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेली असल्याने त्या तरुणीने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे हिंमत वाढल्याने तो तरुण पुढेही तिच्यावर अत्याचार करीत राहिला. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. 


तरुणीने टोकाचं पाऊल उचललं...


तरुणाकडून वारंवार झालेल्या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहिली. ही बाब तिच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने विचारणा केली. यावर त्या तरुणीने घडलेला प्रकार सांगितला. यामुळे समाजात बदनामी होण्याची चिंता दोघींनाही लागलेली असतानाच त्या तरुणीने बुधवारी रात्री शेतात पिकावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. यात तिचा मृत्यू झाला. तर मुलीच्या आईने वीरगाव पोलिस ठाणे गाठून संबंधित नराधम तरुणाविरोधात तकार नोंदवली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी भूमिका महत्वाची ठरली...


संबंधित तरुण आणि तरुणी हे दोघेही नात्यातील असल्याने या प्रकरणामुळे गावात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, वीरगाव पोलिसांनी मृत झालेल्या त्या तरुणीला तातडीने सरकारी दवाखान्यात हलवले. दुसरीकडे मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच तातडीने नराधम तरुणाला अटक केली. या घटनेने पिडीत मुलीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.