Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (10 जून) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने एक एक मत महत्त्वाचं आहे. त्यातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. परंतु शिवसेनेला पाठींबा दिला असला तरीही शिवसेनेसोबतचे वैचारिक आणि राजकीय मतभेद कायम असणार असल्याच जलील म्हणाले आहे.


महाविकास आघाडीला पाठींबा जाहीर केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, एमआयएम पक्षाने राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा दिला आहे. काल दिवसभर आमची महाविकास आघाडीच्या सर्वच महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला विनंती केली होती की, भाजपचा पराभव करण्यासाठी तुमचंही मत महत्वाचे आहे. त्यामुळे आमच्या दोन मतांमुळे जर लाखो लोकांचा फायदा होत असेल तर आपण महाविकास आघाडीला का मतदान करू नयेत असे आम्ही ठरवले. मात्र राज्यसभा निवडणुकीत महावीकास आघाडीला पाठींबा दिला असला तरीही शिवसेनेसोबतचे वैचारिक आणि राजकीय मतभेद कायम असणार असल्याच जलील यावेळी म्हणाले आहे.


एमआयएमच्या अटी-शर्ती... 


महाविकास आघाडीला पाठींबा देतांना काही अटी-शर्ती सुद्धा घातल्या असल्याच जलील म्हणाले आहे. ज्यात एमआयएमचे धुळे आणि मालेगाव येथील आमदारांना विकास निधी मिळत नसल्याने त्यांना सुद्धा विकास निधी देण्यात यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. सोबतच अल्पसंख्याकाबाबत सुद्धा आपण काही मुद्दे मांडले असून, मुस्लीम आरक्षण देण्याबाबत मागणी केली आहे. राज्यभरातील वफ्फ बोर्डाच्या जागेवर असलेल्या सरकारी कार्यलयांनी बोर्डाला भाडे द्यावे, एमपीएससीवर अल्पसंख्याकांक सदस्याची नियुक्ती करण्यात यावी अशा मागण्या आपण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याच जलील म्हणाले.