Aurangabad Crime News: लाडक्या जावयाचा सासुरवाडीत वेगळाच थाट असतो. त्यामुळे घरी आलेल्या जावईसाठी काय करावे अन् काय नाही अशी अवस्था सासरच्या मंडळींची होते. मात्र औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी गावात जरा आगळीवेगळीच घटना घडली आहे. सासरी आलेल्या जावईसाठी पुरणपोळी बनवून दिली नाही म्हणून एका सासूने आपल्या सुनेला बेदम मारहाण केली. एवढच नाही तर तिच्या डोक्यात किचनमध्ये वापरली जाणारी लोखंडी पक्कड डोक्यात घातली. त्यांनतर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की,बाजारसावंगी गावात राहणाऱ्या सुमनबाई भिवा गायकवाड यांच्या घरी त्यांचा जावई आला होता. जावई घरी आला म्हणून काहीतरी गोडधोड बनवावं म्हणून सुमनबाई यांनी आपली सून मनीषा मिठू गायकवाडला पुरणपोळी करायला सांगितले. पण घरामध्ये सामान नाही मग पुरणपोळी कशी करू असं सून म्हणाली. त्यामुळे संतापलेल्या सुमनबाई यांनी सुनेला बेदम मारहाण केली. 


लोखंडी पक्कड डोक्यात घातली...


तू माझ्या जावईला पुरणपोळी का नाही बनवली असे म्हणत सुमनबाई यांनी मनीषा यांना शिवीगाळ करत आधी लाथा बुक्याने मारहाण केली. त्यांनतर किचनमध्ये असलेलं लाटण घेवून ओठावर मारून जखमी केलं. तर याचवेळी मनीषा यांचा पती मिठू गायकवाड याने सुद्धा लोखंडी पक्कड डोक्यात घालून त्यांना जखमी केलं. त्यांनतर मनीषा यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गहू खाल्ले म्हणून सासूला मारहाण 


दुसऱ्या एका घटनेत पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील कोळी बोडखा येथे एका सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे. मी घरी नसतांना माझे अर्धी गोणी गहू का खाल्ले म्हणत सुनेने सासूला मारहाण केली. तर उजव्या हातावर चावा घेऊन जखमी केलं आहे. तसेच लाथा बुक्क्याने मारहाण करून जखमी केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.