Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांचं विशेष पथक आणि वाळूज पोलिसांनी मेडिकल चालक आणि दोन एजंटला अटक करून त्यांच्याकडून नशेच्या तब्बल 2048 गोळ्या जप्त केल्या आहे. पोलिसांनी केलेल्या एवढ्या मोठ्या कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत शहरात सुरु असेलला नशेच्या 'बटन गोळ्या'च्या बाजार आता ग्रामीण भागात सुद्धा पसरला असल्याचे सुद्धा या कारवाईनंतर समोर आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात नशेच्या 'बटन गोळ्या' नेमक्या येतायत कुठून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
अशी केली कारवाई...
पंढरपूर परिसरातील मेडिकल चालकांकडून गोळ्या विकल्या जात असून त्या गेवराई तांडा परिसरातील तरुण सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी आधी डमी ग्राहकाला पाठवून खात्री केली. त्यांनतर सापळा रचून लांजी रोडवर तारासिंग जगदीशसिंग टाक (20) यास गोळ्या विकण्याच्या तयारीत असताना पकडले असता, त्याच्याकडे 248 गोळ्या सापडल्या.
तारासिंग याला खाक्या दाखवताच त्याने आधी लांजी रोडवरील शिव मेडिकलचे नाव घेतले. पथकाने तत्काळ मेडिकलचा मालक शिवप्रसाद सुरेश चनघटे (24) याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडेही 75 गोळ्या सापडल्या. त्यांनतर आणखी एका मेडिकल एजन्सीवर काम करणारा महेश उनवणे (29) या गोळ्या पुरवत असल्याचे तारासिंगने सांगताच पथकाने रात्रीतून त्यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे 1725 गोळया सापडल्या. तिघांकडून नशेच्या एकूण 2048 अल्फाईलोम गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
'बटन'चा धुमाकूळ...
शहरातील तरुणाई बटन गोळ्याच्या आहारी गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी औरंगाबादमध्ये पोलिसांनी तब्बल 600 बटन गोळ्या पकडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर सुद्धा रोज कुठे ना कुठे कारवाई सुरूच आहे. त्यात आता पुन्हा एकदा दोन हजार गोळ्या पुन्हा एकदा पकडण्यात आल्या आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे आता या 'बटन गोळ्या'चा लोण ग्रामीण भागात सुद्धा जाऊन पोहचले आहे.
विशेष पथकाची स्थापना...
शहरात नशेच्या बटन गोळ्याचा धुमाकूळ पाहता पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने आतापर्यंत अनेक कारवाया केल्या असून, अजूनही सुरूच आहे. मात्र तरीही या गोळ्या विक्रीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकले नाही. विशेष म्हणजे यात मेडिकल चालकांचाच सहभाग पाहायला मिळत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे.