Aurangabad Crime News: राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर देखील औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) जवळपास सर्वत्र बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अशाच गुटखा विक्रेत्यावर मोठी कारवाई करत, तब्बल 13 लाख 77 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे असून, ट्रक चालक दत्ता आनंदराव मंडाळ, (वय, 27, रा. मानेपूरी, ता. घनसावंगी, जि. जालना. ह. मु. नरोली, ता.जि. सिल्वासा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरातील साजापूर येथे एक आयशर ट्रक भरून गुटखा येणार असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचं पथक धुळे-सोलापूर हायवेवरील साजापूर भागातील राजस्थान धाब्याजवळ पोहचले. यावेळी त्या ठिकाणी उभा असलेला आयशर ट्रक क्रमांक डीडी 01 सी 9551 वर  पोलीस पथकाने छापा मारला.


खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी साजापूर येथील एका उभा असलेल्या ट्रकवर छापा मारला. दरम्यान या ट्रकची चौकशी केली असता त्यात राज्य सरकारने बंदी घातलेला गुटखा मिळून आला. याबाबत अधिक चौकशी करत पोलिसांनी गोवा गुटखा व सुगंधीत तंबाखु असा सुमारे 13 लाख 77 हजारांचा गुटखा आणि 11 लाखांची ट्रक असा एकूण 24 लाख 77 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर याप्रकरणी अन्न औषधी निरीक्षक सुलक्षणा त्रिंबकराव जाधवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यांनी केली कारवाई!


ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपआयुक्त दिपक गीऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तसेच विशेष तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक चेतन ओगले, विनोद नितनवरे, पंकज साळवे, सुरेश कचे, यशवंत गोबाडे, सुरजकुमार अग्रवाल यांनी केली.


सर्वत्र गुटख्याची विक्री!


राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू आहे. गावागावातील टपऱ्यापासून तर होलसेल दुकानापर्यंत सर्वत्र गुटखा उपलब्ध होत आहे. मात्र असे असतानाही प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाया किंचित आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad News : औरंगाबादेत महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला