Aurangabad crime News: शहरातील एन-3, सिडको भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून, गाडीवर चालक म्हणून कामाला असलेल्या व्यक्तीला कामावरून काढले म्हणून तो चक्क मालकाच्या घरात तलवार घेऊन घुसला. तर घरात घुसल्यावर मालकाच्या कुटुंबाला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र गुन्हेशाखेला वेळीच माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपीला पकडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पाटलोबा ऊर्फ बबन बालाजी फड (42, आविष्कार कॉलनी, एन-6, सिडको) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक असलेले संजय कोंडिबा नागरे (रा. एन-3, सिडको) यांची वाळूज एमआयडीसीत बीअरची कंपनी आहे. दरम्यान, आरोपी फड हा नागरे यांच्या गाडीवर चालक म्हणून कामाला होता. मात्र त्याला दारू पिण्याच्या सवयी असल्याने नागरे यांनी काही दिवसांपूर्वी कामावरून कमी केले होते. त्याचा राग मनात धरून फड हा नागरे यांच्या एन-3 मधील घरी गेला. तेव्हा त्याच्या हातात तलवार होती. 


कुटुंब घाबरलं...


आपल्याला कामावरून काढल्याचा राग असल्याने फड हातात तलवार घेऊन नागरे यांच्या घरात गेला. यावेळी घरात नागरे यांच्यासह त्यांचा मुलगा सागर, आकाश आणि पत्नी, सून व नातवंडेही घरीच होती. अचानक फड हातात तलवार घेऊन समोर उभा असल्याचे पाहून घरातील सर्वजण प्रचंड घाबरले. विशेष म्हणजे फड हा त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने घरी आला होता. 


पोलीस तात्काळ पोहचले घटनास्थळी...


फड घरात तलवार घेऊन उभा असल्याने नागरे यांनी हा प्रकार तत्काळ पोलिसांना कळविला. तर गुन्हेशाखेला याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी या भागात गस्तीवर असलेल्या पथकाला माहिती देऊन नागरे यांच्या घरी जाण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काही क्षणात पथक नागरेंच्या घरी पोहचले. 


मोठा अनर्थ टळला...


माहिती मिळताच गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथक तात्काळ संजय नागरे यांचे घरी पोहचले. त्यावेळी संजय नागरे यांच्या घरात फड हा हातात तलवार घेवून उभा होता, तर नागरे व त्यांचे कुटूंब घाबरलेले होते. त्यामुळे पोलिसांनी फड याला ताब्यात घेऊन त्याच्या हातातील तलवार सुद्धा ताब्यात घेतली. त्यानंतर नागरे यांच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.