Aurangabad Crime News: औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील (Aurangabad Rural Police) एका पोलीस कर्मचाऱ्याच्या करानानाम्यांनी संपूर्ण पोलीस दलाची मान शरमेनी खाली केली आहे. कारण एखाद्या गुन्हेगारालाही लाजवेल असे 'या' पोलीस कर्मचाऱ्याचे कारनामे समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलीस दलातून निलंबित केल्यावर सुद्धा त्याने पुन्हा शहरातील आकाशवाणी चौकात राडा घालत रस्त्यावरील तरुणांना नाहक मारहाण केल्याचे समोर आले आहे. साहेबराव इखारे (रा. कैलासनगर) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 


काही दिवसांपूर्वी क्रांती चौकातील पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या साहेबराव इखारेने पुन्हा एकदा शहरातील आकाशवाणी राडा घातला आहे. त्याने 25 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर दोन तरुणांना आकाशवाणी चौकात दगड, लाकडी दांड्याने विनाकारण मारहाण केली. विशेष म्हणजे साहेबराव याच्यावर 2016 पासून 2022  पर्यंत तब्बल पाच गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात बलात्काराचा सुद्धा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे साहेबराव इखारेने पोलिस आहे की रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


साहेबराव इखारे विरोधात गंभीर गुन्हे दाखल... 


स्वतः पोलीस असलेल्या इखारेविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत ज्यात जिन्सी ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तपासात या गुन्ह्यात सी फायनल पाठविलेले आहे, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, 2018 मध्ये इखारेविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात आणि 2019  मध्ये जिन्सीत मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 17 सप्टेंबरला क्रांती चौक ठाण्यातील पोलिस कर्मचारी सजनसिंग डोभाळ यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल असून आठ दिवसांतच पुन्हा जिन्सी ठाण्यात त्याच्याविरुद्ध तरुणांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर या मारहाणीच्या एक दिवस आधीच त्याला निलंबित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 


तरुणांना विनाकारण मारहाण...


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मयूर चंद्रसिंग सोळुंके ( वय 25 वर्षे,रा. नागेश्वरवाडी) मध्यरात्री भूक लागल्याने आपला भाऊ अजय इंगळेसह दुचाकीने काहीतरी खायला आणण्यासाठी बाहेर पडला. दरम्यान आकाशवाणी चौकात एचडीएफसी बँकेसमोर काही तरुणांचे भांडण सुरू होते. याचवेळी त्यांतील तिघांनी बाजूला येऊन मयूर सोळंके व अजय इंगळे यांना पकडले. 'तुम्ही कोठे पळून जाता?' असा जाब विचारून त्यांनी मयूर व अजय यांना पकडून ठेवत मारहाण सुरू केली. पोलिस कर्मचारी साहेबराव इखारे याने मयूरच्या नाकावर दगडाने मारून जखमी केले. तर इतर दोघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण केली.