Aurangabad OBC Survey: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला असून, त्या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील ओबीसी डेटा समर्पित आयोगाला सादर करण्यात आला आहे. सादर करण्यात आलेल्या अहवालात औरंगाबाद जिल्ह्यात 27 टक्के तर शहरात 18 टक्के ओबीसी असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे स्थानिकांची मदत घेऊन आडनावांवरून हा झटपट सर्वेक्षण करण्यात आला आहे.
काय आहे अहवालात...
समर्पित आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, जिल्ह्यात 868 ग्रामपंचायती अंतर्गत 17 लाख 426 मतदार असून, मतदार यादीच्या सर्वेनंतर 4 लाख 59 हजार 574 म्हणजेच 27.2 टक्के ओबीसी असल्याचे समोर आले आहे. तर शहरातील 880 बुथवर बीएलओंच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात 18 टक्के ओबीसी असल्याचे समोर आले आहे.
कोणत्या तालुक्यात किती ओबीसी?
प्रशासनाने समर्पित आयोगाला सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 27 टक्के ओबीसी आहे. ज्यात वैजापूर तालुक्यात 48 टक्के ओबीसी आहेत, सोयगाव तालुक्यात 42 टक्के, औरंगाबाद तालुक्यात 25 टक्के, खुलताबाद तालुक्यात 23.04 टक्के, पैठण 27.85, गंगापूर 26.11, सिल्लोड 24.18, फुलंब्री 21 आणि कन्नड तालुक्यात 36.77 टक्के ओबीसी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय सोडतला भाजपचा विरोध
राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत प्रकिया पार पडली. मात्र ओबीसी आरक्षणाच्या शिवाय आरक्षण प्रकिया पार पडल्याने पैठण येथे भाजपकडून सभागृहाचा त्याग करत प्रकियेवर बहिष्कार टाकण्यात आला. आरक्षण भाजपचे माजी नगराध्यक्ष सुरुज लोळगे यांनी यावेळी ओबीसी आरक्षण मिळालच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळेसाठी सभागृहात गोंधळ उडाल्याच पाहायला मिळाले.