Prashant Bamb On Sharad Pawar: सोमवारी झालेल्या गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला असून, ठाकरे गटाने संपर्ण 20 जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान याच पराभवानंतर आमदार प्रशांत बंब यांची पहिली प्रतिक्रिया आली असून, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामतीच्या काकांनी राज्यात भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले असून, त्यांच्या अनुयायींच्या खोट्यापणाला आणि त्यांनी पसरवलेल्या अफवांना शेतकरी, सभासद, नागरिक बळी पडत असल्याचं आमदार बंब म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना बंब म्हणाले की, गंगापूर साखर कारखानाच्या निवडणुकीत एक हजार मतांच्या फरकाने आमच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही हजारो मतदारांनी विश्वास ठेवला त्यांचे आभार व्यक्त करतो. पराभव हे काही नवीन बाबी नाहीत. आपल्या राज्यात काही अशा राजकारणी लोकांची महिमा गेल्या 55 वर्षांपासून चालू आहे. त्याचे प्रमुख लीडर बारामतीचे काका आहेत. ते आणि त्यांचे अनुयायी, खास करून मराठवाड्यात सहकारी संस्था आणि बँका यांच्यावर पगडा ठेवून भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत. यांच्याकडून प्रचंड लुट करण्यात येते. तरीही आपल्या विभागाचे शेतकरी, सभासद, नागरिक त्यांच्या खोट्यापणाला आणि त्यांनी पसरवलेल्या अफवांना बळी पडत असतात. तसेच त्यांच्याच हातात सत्ता देतात. तसेच प्रयोग गंगापूर कारखाना निवडणुकीत झाला असल्याचं बंब म्हणाले.
दसऱ्याला पूर्ण क्षमेतेने कारखाना सुरु करून दाखवा
तर पुढे बोलताना बंब म्हणाले की, गंगापूर कारखान्याच्या निवडणुकीतील निकाल पाहून मला आश्चर्य वाटत नाही. कारण बारामतीच्या काकांच्या लीडरशिपमध्ये हजारोच्या संख्येने असलेल्या लोकांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले जातात. तर आपल्याच भागातील त्यांचे अनुयायी त्यांचे पाईक बनवून वागतात. त्यामुळे तेव्हा त्यांना नावं ठेवून फायदा नाही. आता मी त्यांना भविष्यात सांगू इच्छीतो की, आपल्या जबाबदाऱ्या आणखीन वाढल्या आहेत. त्याचे कारण असे आहे की, राज्यात आपण एकमेव असे होते ज्यांनी बंद पडलेल्या कारखान्यात हात घातला. कारखाना वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपये मित्रांच्या मदतीने तिथे लावले. विरोधकांनी कोर्ट कचेऱ्या करून, जवळपास अर्धा वर्षे शेतकऱ्यांचा छळ केला. तरीही त्यांना शेतकऱ्यांनी त्यांना निवडून दिले असेल. तर त्याचे काहीतरी लॉजिक असेल. त्यामुळे निवडून आलेल्या आपल्या विरोधकांनी सांगितलेल्या प्रमाणे येत्या दसऱ्याला पूर्ण क्षमेतेने कारखाना सुरु करावा, असे आवाहन बंब यांनी दिला आहे.
अशी झाली लढत...
गंगापूर सहकारी साखर कारखान्यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत झाली होती. दरम्यान या निवडणुकीत मतदारांनी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनेलला एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. ज्यामुळे बंब यांच्या पॅनेलच्या संपूर्ण 20 उमेदवारांचा पराभव झाला आहे. तर खुद्द आमदार बंब यांना देखील स्वतःला निवडून आणता आला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Aurangabad : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब यांचा पराभव