Chandrakant Khaire On Election Commission: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा समजला जात असून, सत्तासंघर्षातल्या महत्वाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. दरम्यान एकीकडे ही सुनावणी सुरु असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठं वक्तव्य करत गंभीर आरोप केला आहे. तर शिवसेना कोणाची याबाबत ज्या निवडणुक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे, त्या निवडणूक आयोगाच्या भुमिकेवर खैरे यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. 


काय म्हणाले खैरे...


सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी प्रतिक्रिया देताना खैरे म्हणाले की, आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर काही लोकं बातम्या पुरवत आहे. निवडणूक आयोगात जर आम्ही एखादा अर्ज दिला, तर त्याच्या पाच मिनिटापूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो. त्यामुळे कुठेतरी लिकेज होत आहे. केंद्र शासनाच्या काही यंत्रणा अशा आहेत की, आम्ही कोणता कागद दिला आणि त्यापेक्षा शिंदे गटाने कोणता कागद द्यावा याबाबत माहिती पुरवतात, असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यामुळे खैरे यांच्या दाव्यामुळे थेट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.