Advantage Maharashtra Expo 2023: औद्योगिक प्रदर्शन अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2023ची (Advantage Maharashtra Expo 2023 Aurangabad) तयारी पूर्ण झाली आहे. शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरिक (DMIC) येथे 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान उद्योजकां प्रदर्शन भरणार आहे. तर उद्या गुरुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं 'ऑनलाइन उद्घाटन' होणार आहे. तर यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद (Aurangabad) येथील अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोला हजेरी लावणार असल्याचे देखील बोलले जात आहे. 


मराठवाड्यातील उद्योजकांची संघटना 'मसिआ'च्या वतीने आयोजित केलेले हे प्रदर्शन तब्बल 30 एकरांवर भरवले जात आहे. यासाठी 4 दिवसांत 650 स्टॉल्स आणि 11 चर्चासत्रांच्या माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर दाखविली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन पद्धतीने अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन करणार आहे. तर समारोपाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. 


यंदा 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान ऑरिक सिटी, शेंद्रा येथे एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांची क्षमता जगासमोर मांडणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विकासासाठी प्रोत्साहन देणे, लघुउद्योजकांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणे, तसेच नवीन उत्पादने व तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देणे, हे प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. 'मसिआ ' सोबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग, एमआयडीसी आणि ऑरिक सिटीच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. 


यांची उपस्थिती असणार आहे...


या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 जानेवारी रोजी सकाळी 10  वाजता पंतप्रधान मोदी ऑनलाइन पद्धतीने करतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, खासदार इम्तियाज जलील, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थित असेल. रविवारी समारोपास केंद्रीय मंत्री गडकरी यांची उपस्थिती असेल.


तब्बल 30  एकरांवर भरणार अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 


या प्रदर्शनात 30 एकरांवर 650 हून अधिक जास्त स्टॉल्स असतील. चार दिवसांत 1 लाख अभ्यागतांनी भेट देणे अपेक्षित असून 10, 500 चौरस मीटरवर प्रॉडक्ट डिस्प्ले, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगांचा सहभाग, औद्योगिक क्षेत्राशी निगडित सेमिनार, परिसंवाद, कार्यशाळा, व्हेंडर डेव्हलपमेंट व बीटूबी प्रोग्रामचे आयोजन आदी वैशिष्टे असतील. मेक इन इंडिया व आत्मनिर्भर भारतवर भर, ऑरिकसह इतर औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी विशेष कक्षही असणार आहे.