औरंगाबाद : गावात मोबाईल रेंज नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संपूर्ण गावाने घेतला आहे. औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील कळंकी गावातील ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.
कंळकी गाव धार्मिक, सामाजिक, पर्यटन इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात हे गाव असल्याने गावाचा इतर भागांची संपर्क तुटलेला आहे. गेल्यावर्षी गावात बीएसएनल आणि एका खासगी मोबाईल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र दीड वर्ष उलटूनही आणि वेळोवेळी पाठपुरावा करुनही अद्याप ही सेवा सुरु झाली नाही. त्यामुळे गावात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या आहे.
मोबाईल नेटवर्क नसल्याने कळंकी गावातील अनेक ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. शासकीय योजनांपासून नागरिकांना वंचित राहावं लागत आहे. याशिवाय वडनेर-कळंकी आणि कळंकी-चिवळी या रस्त्याचीही अवस्था बिकट आहे. त्यामुळेही नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
कळंकी ग्रामस्थाना अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र लोकप्रतिनिधींकडून याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
VIDEO | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट