औरंगाबाद : राज्यात भाजप सरकारविरोधात जनतेमध्ये मोठी नाराजी आहे. अशा परिस्थितीत पुलवामासारखी घटनाच निवडणुकीआधी स्थिती बदलू शकते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीआधीही मोदी सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी होती, मात्र पुलवामा हल्ला झाला आणि सगळी परिस्थिती बदलली, असं शरद पवारांनी म्हटलं.
पुलावामा हल्ल्याबद्दल लष्करी अधिकाऱ्यांनाच शंका होती की, हा हल्ला नेमका घडला का घडवला. मात्र हा देशाचा विषय आहे, म्हणून त्यावर बोलू नका असं मी स्पष्ट सांगितले होतं. पुलवामासारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रमध्ये बदल नक्की घडेल, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे, असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात,असे मी म्हणालो होतो. आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे, असा सवालची पवारांनी विचारला.
पंतप्रधान नरेंद्र काहीही बोलण्याइतके कर्तृत्ववान आहेत. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीमधील महत्वाचं पद आहे. या पदाची मला किंमत ठेवायची आहे. या पदाची मला अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही, हे मी मुद्दाम सांगतो, असं शरद पवार म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगायची गरज नाही. पण पंतप्रधानांनी असे बोलण्याची गरज नव्हती, असं शरद पवारांनी म्हटलं.