औरंगाबाद : शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याच्या वेळीही सीएमओच्या ट्वीटमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. आता औरंगाबादमध्ये 'सुपर संभाजीनगर' असा फलक दिसू लागला आहे. औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात 'सुपर संभाजीनगर' हा फलक लावला आहे.


शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्याशी संबंधित एनजीओने हा फलक लावला आहे. औरंगाबाद महापालिकेची परवानगी घेऊनच फलक लावल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या जुन्या नाण्यांच्या इतिहासासह 'सुपर संभाजीनगर' हा फलकही लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बोर्डसमोरच 'आय लव्ह औरंगाबाद' असा सुद्धा फलक आहे.


महापालिकेच्या स्मार्ट सिटी युनियनकडे अर्ज केला होता. औरंगाबादमध्ये दहा ठिकाणी सुपर संभाजीनगर फलक लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्यापैकी दोन ठिकाणी हे फलक लावण्याची परवानगी मिळाली आणि त्यानुसार फलक लावले. यावरुन फार आकंडतांडव करण्याची गरज नाही. ज्यांना औरंगाबाद म्हणायचं आहे त्यांनी ते म्हणावं. आम्ही संभाजीनगरच बोलतो आणि आम्हाला संभाजीनगरच आवडतं. शहराला सुपर पद्धतीने पुढे नेण्याची ही संकल्पना आहे. त्यामुळे सुपर संभाजीनगर हे फलक लावलेलं आहे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.


नामांतराच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण औरंगाबादकरांसाठी नवीन नाही आता 'सुपर संभाजीनगर' या बोर्डामुळे त्याला कोणतं वळण मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.