औरंगाबाद : कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून ओळखले जाणारे आस्तिक कुमार पांडे आज औरंगाबाद महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले. आस्तिक कुमार पांडे यांनी आपल्या कामाकाजाची सुरुवात अगदी दणक्यात केली. आस्तिक कुमार पांडे यांना स्वागताचा पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्यालाच त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. कारण प्लास्टिक बंदी असताना, प्लास्टिक लावून पुष्पगुच्छ आणल्यामुळे आस्तिक कुमार पांडे यांनी ही कारवाई केली.

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर औरंगाबादचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीसाठी प्रदीर्घ रजेवर गेले. परंतु ते पुन्हा रुजू न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली होती. परिणामी विकासकामं ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली केली. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी 4 डिसेंबर रोजी या संदर्भातील आदेश जारी केला.

त्यानुसार आस्तिक कुमार पांडे आज औरंगाबाद महापालिकेत रुजू झाले. यावेळी नगररचना विभागाचे प्रमुख आर एस महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. परंतु या बुकेला प्लास्टिक लावलं होतं. राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही, पुष्पगुच्छाला प्लास्टिक लावलेलं आढळलं. यामुळे नव्या मनपा आयुक्तांनी जागेवरच रामचंद्र महाजन यांच्याकडून पाच हजार रुपयांचा स्पॉट फाईन वसूल करण्याचा आदेश दिला. महापालिका आयुक्तपदी रुजू होताच आस्तिक कुमार पांडे यांचा दणका म्हणजे पुढील काळात महापालिकेतील कामकाज चांगलंच गाजणार हे मात्र नक्की.



स्वत:लाही पाच हजारांचा दंड
यापूर्वी आस्तिक कुमार पांडे यांनी स्वत:वरच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना, चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा वापर केल्याने स्वत:लाच दंड ठोठावला. बीडमध्ये निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला होता. काही पत्रकारांनी प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्यास नकार दिला. प्लास्टिकवर बंदी असताना अशा कपांमध्ये चहा का दिली जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पत्रकारांसमोर स्वत:ला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने स्वत:वर दंड ठोठावण्याचं हे देशातील कदाचित पहिलंच प्रकरण असेल.

गुटखा, पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती स्वच्छ केल्या!
आयएएस आस्‍तिक कुमार पांडे स्‍वच्‍छतेबाबतही अतिशय जागरुक आहेत. अकोल्याचे जिल्हाधिकारी असताना, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयाला अचानक भेट दिली होती. यावेळी कार्यालयातील अस्वच्छतेबाबत त्यांनी संबंधितांना चांगलंच फैलावर घेतलं. यावेळी त्यांना भिंतींवरील पान आणि गुटख्याच्या पिचकाऱ्यांचे डाग दिसले. मग त्यांनी स्वत:च ती भिंत स्वच्छ करायला सुरुवात केली. आस्तिक कुमार पांडे यांच्या या गांधीगिरीमुळे तिथले कर्मचारी मात्र खजिल झाले.