औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यात-देशात अनेक करुण कहाण्या आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत. त्यात आता आणखी एक दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे अवघ्या सात दिवसांत बाळ आईविना पोरकं झालं आहे. घाटी रुग्णालयात काल (4 जून) दुपारी दोन वाजता ही अत्यंत वेदनादायी घटना घडली.
शहरातील कटकट गेट भागातील 30 वर्षाची एक महिला 28 मे रोजी घाटी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचा पहिल्या दिवशीचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. आई आणि डॉक्टरांसाठी ही आनंदाची बातमी होती. बाळ-बाळंतीण सुरक्षित होते. पण 29 मे रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. बाळ कोरोना मुक्त राहावं म्हणून आई आणि बाळाला वेगळे ठेवण्यात आले. बाळाला नवजात शिशू विभागात ठेवलं. आईचं दूध बाळापर्यंत पोहोचवण्यात येत होतं. पण एक-दोन दिवसात महिलेला अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या महिलेला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. त्या बाळाने आईचा चेहराही लक्षात राहिला नसेल, शिवाय आईलाही बाळाला डोळे भरुन पाहिलं नसेल. मात्र त्याआधीच नियतीने त्यांची कायमची ताटातूट केली आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आतापर्यंत 22 कोरोना पॉझिटिव्ह महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. या बाळांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही काळ आई आणि बाळांना वेगळं ठेवलं गेलं. डॉक्टरांनी व्हिडीओ कॉल करुन आई आणि बाळांची भेट देखील घडून दिले दिली. उपचारानंतर यातील काही बाळं घरी जाऊन आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित आहेत. बाळ आणि आई कोरोनातून सुरक्षित बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सर्व टीमने त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला. कोरोनाशी लढा देऊन आई जेव्हा बाळाला कुशीत घेते तो क्षण आतापर्यंतच्या सेवेतील अंत्यत आनंदाचा होता, असं या विभागाच्या डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं. मात्र कालचा क्षण हा अत्यंत वेदनादायी होता हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.
औरंगाबादेत कोरोनाची स्थिती कशी?
औरंगाबाद जिल्ह्यात आज (5 जून) सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1828 वर पोहोचली आहे. यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 609 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.