औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जसे देशभरातील डॉक्टर, नर्स काम करत आहेत, यांच्यासोबतच आशा वर्कर्सही पदर खोचून कामाला लागल्या आहेत. शहर असो की गाव, घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याची माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर करत आहेत. पण त्यांना या कामाचा दिवसभराचा मोबदला मिळतो तो केवळ 30 रुपये. त्यामुळे 30 रुपयांसाठी जीव धोक्यात का घालायचा असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांचा दिनक्रम कसा असतो? त्यांचं काम कसं असतं? या संकटाला त्या कसं सामोरं जातात, हे दिवसभर त्यांच्यासोबत फिरुन आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी जाणून घेतलं.
हातात वही-पेन घेऊन कोरोनाच्या संकटातही दारोदारी फिरुन माहिती गोळा करण्याचं काम आशा वर्कर्स करत आहेत. राज्यात सात हजार आशा वर्कर सध्या कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या आशा वर्कर्सचं काम आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी सुरुवातीला आम्ही एन आठ भागात राहणाऱ्या मनिषा बिडवे यांच्या घरी पोहोचलो. सहा-सात जणांचं कुटुंब. मनिषा 2005 पासून अशा वर्कर म्हणून काम करत आहेत. घरी स्वयंपाक, पाणी धुणीभांडी करायची पोराबाळांना जेवू घालायचं आणि नंतर आवरुन दवाखान्याकडे निघायचं. घरापासून दवाखाना अर्धा किलोमीटरवर. पाच-दहा मिनिटे पायी प्रवास केल्यानंतर एन आठ भागातील दवाखान्यात पोहोचतात. तिथे त्यांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिलं जातं आणि पुढे दिवसभराचा टास्कही. ज्या भागाचा सर्वे करण्यास करायला सांगितलं जातं तिथपर्यंत त्यांना पायीच प्रवास करावा लागतो.
प्रवासात जाताना आम्ही मनिषा यांना विचारलं की तुम्ही अशा वर्कर का झालात? त्यावर त्यांचं उत्तर होतं की सासऱ्यांना कोणीतरी सांगितलं होतं असं काहीतरी काम आहे. त्यांनी यासाठी परवानगी दिली आणि त्यात कामाला लागल्या. पुढे पतीचं निधन झालं त्यात त्यांनी घेतलेला हा निर्णय कामी आला. पुढे बोलताना आम्ही त्यांना लोकांच्या अनुभवाबद्दल विचारलं. तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता त्यावेळी उत्तर कशी मिळतात? याबाबतीत अनुभव चांगला असल्याचं त्या म्हणाल्या. आजपर्यंत लोकांनी त्यांचे स्वागतच केले आहे. कोणी चहा दिला आहे, कोणी पाणी दिलं. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारच्या दोन वाजेपर्यंत लोकांची उंबरे झिजवायचे, माहिती गोळा करायची, कुणाला लक्षणे दिसली तर हॉस्पिटलला कळवायचं आणि ते हॉस्पिटलपर्यंत कसे पोहोचतील यावर लक्ष ठेवायचं हे सतत एकाच विभागांमध्ये 14 दिवस करायचं. मग पुढे सहज त्यांना त्यांच्या मानधनाविषयी छेडलं. त्यावर त्या म्हणाल्या की, आम्हाला महिन्याला मानधन मिळतं ते एक हजार रुपये. अनेकांची उपजीविका या मानधनावर असते.
त्यांच्या टीममध्ये असलेल्या आणखी एक आशा वर्कर ज्यांचं नाव उज्ज्वला तोडकरी. त्यांच्या घरात दोन मुली आहेत, एक अपंग आहे, पती गावाकडे असतो. काही काम नाही म्हणून आशा वर्कर म्हणून त्या आता काम करु लागल्या. हजार रुपये मिळतात, आणखी दिवसभरात जे मिळेल ते काम करते आणि पोराबाळाची उपजीविका भागवते, असं उत्तर त्यांनी दिलं. शेतात काम करणाऱ्या गड्याला दिवसाचे तीनशे रुपये मिळतात मग आम्हाला 30 रुपये का या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हतं ना सरकारकडे असेल, असं मला वाटतं.
कोरोनाचं काम करणाऱ्यांना सरकारने 50 लाखांचा आरोग्य विमा जाहीर केला आहे. पण 50 लाखांचा विमा देणारे सरकार जिवंत असताना पुरेसे मानधन द्यायला का तयार नाही. जीव धोक्यात टाकून दिवसभर लोकांच्या दारोदारी हिंडून आमच्या जीवाची किंमत 30 रुपये का असा सवाल आशा वर्कर विचारतात.
लोकांच्या आरोग्यासाठी या आशा वर्कर्स सर्वे करत आहेत. परंतु त्यांच्यावर काही ठिकाणी हल्ले देखील झाले आहेत. कोरोना त्या संकटात डॉक्टर, नर्स जसे देवदूत म्हणून काम करत आहेत तशाच्या आशा वर्करही काम करतात, मात्र त्यांच्या कामाला ना मोल नसल्याची खंत त्यांच्या मनात आहे. प्रत्यक्ष लोकांच्या दारात उभा असलेल्या आशा वर्कर्सना आपण ज्यांची माहिती घेतोय तो माणूस कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याची माहिती नसते. मात्र तरीही त्या आपला जीव धोक्यात टाकून माहिती गोळा करत असतात. त्यांच्या या कार्याचे चीज व्हायला हवं. सरकारने त्यांचं मानधन वाढवून देण्याचा विचार करायला हवा, अशी अपेक्षा आशा वर्कर्सच्या जिल्हाध्यक्ष मंगल ठोंबरे यांनी व्यक्त केली.
मंडळी आपण कधी हा विचार केला का की तीस रुपयांमध्ये काय मिळतं? तीस रुपयांमध्ये मुंबईत बऱ्या हॉटेलमध्ये एक कप चहा मिळतो, दोन वडापाव मिळतील, पण धड नाश्ताही होणार नाही. याच तीस रुपयांसाठी या आशा वर्कर कोरोनाच्या संकटातही काम करत असतात. या कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात टाकून काम करणाऱ्या या आशा वर्कर च्या मानधनात वाढ करण्याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात सर्वात समोर जाऊन लढा येणाऱ्या रणरागिणींचं काम, ज्यावेळी कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी सुवर्णाक्षरात लिहलेलं असेल हे नक्की. आशा वर्कर्सच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.