Kirit Somaiya on sharad Pawar : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी करत असलेल्या वसुलीमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागेल असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले. शरद पवार यांनी मान शरमेने खाली घालण्याऐवजी धमक्या देत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. अनिल परब, भावना गवळी, हसन मुश्रीफ हेदेखील तुरुंगात जाऊ शकतात. त्यांच्या नावानेही धमक्या द्या, असे आव्हान सोमय्यांनी दिले. 


भाजप नेते किरिट सोमय्या हे शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली. शिवसेनेचे जालन्याचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर किरीट सोमय्या यांनी 100 कोटी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. जालना साखर कारखाना बेनामी पद्धतीने फसवणुकीने त्यांनी हडप केला असल्याचे त्यांनी म्हटले. काही दिवसापूर्वी मुळ्ये आणि तापडिया यांच्यावर ईडीने औरंगाबादेत छापे टाकले होते. मात्र हा कारखाना त्यांनी नाही तर अर्जुन खोतकर यांनी घेतला असल्याचा थेट आरोप किरीट यांनी केला. राज्य सरकारची 100 एकर जमीन खोतकर हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. अर्जुन खोतकर यांनी 100 कोटींचा घोटाळा आणि एक हजार कोटींची शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचं काम केले आहे. मी त्याची तक्रार केली असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होईल, यात शंका नाही असेही सोमय्या यांनी म्हटले. 



'अनिल देशमुखांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचंय'


महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.