औरंगाबाद : वैजापुर तालुक्यातील तलवाडा (नागवाडी) येथे ड्रॉ पद्धतीने बैल पोळा साजरा करण्यात आला. बऱ्याचदा पोळा सनाच्या मानापानावरुन वाद होतात. पोळ्याचा मान हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा या हेतूने प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. यावेळी लहान मुलाच्या हस्ते बाबासाहेब तातेराव मगर या शेतकऱ्याच्या नावाची चिठ्ठी निघाली.


चिठ्ठीत नाव आलेल्या शेतकऱ्याच्या बैलांना वेसन, मोहरी, माठुकी, कासरा देऊन शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आणि  त्या शेतकऱ्याला पोटळ्याचा मान दिला. यानंतर ज्या शेतकऱ्याला मान मिळाला त्या शेतकऱ्याला नावाची चिठ्ठी पुढील वर्षी काढली जाणार नाही, जेणेकरुन प्रत्येक शेतकऱ्याला मान मिळेल असे कुऊबा समितीचे सभापती भागीनाथ मगर यांनी सांगितले. ड्रॉ पध्दतीने पोळा साजरा झाल्यामुळे गावातील प्रत्येकाला मान मिळणार आहे. अशा पद्धतीने सण साजरे केल्यास सामाजिक सलोखा राखण्यास मदत होते. यावेळी मारुती मंदिरात नारळ फोडून भरपूर पाऊस पडू दे, ईडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे असे मारुतीला साकडं घालण्यात आलं. 


शेतकरी ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून, ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. बैल पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. शेतीप्रधान या देशात, शेतकऱ्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. बैलांच्या सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटुक्या गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, पायात करदोड्याचे तोडे असा श्रृंगार चढवून बैलांना खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य केला जातो. गावाच्या मारुती मंदिराला एक मोठ्या आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणून पोळा सण साजरा केला जातो. 


औरंगाबादमध्ये गालबोल


सर्वत्र आज बैलपोळा साजरा केला जात असताना औरंगाबादमध्ये मात्र या सणाला गालबोट लागलं आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कोळी बोडखा गावात पोळा फोडल्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. वाद एवढा विकोपाला गेला की पोलिसांना अक्षरशः हस्तक्षेप करावा लागला. 


दरवर्षीप्रमाणे कोळी बोडखा गावात पोळा सण साजरा केला जात होता. मात्र यावेळी बैलाच्या माना-पानावरून सुरुवातीला दोन गटात वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. दोन्ही गट आमने सामने आले आणि एकमेकांना मारहाण करायला लागले. दोन्ही गटात वाद सुरू झाल्याने लोकांची धावपळ उडाल्याच पाहायला मिळालं.