औरंगाबाद : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून साखर कारखान्याच्या नावाखाली पैसे गोळा करून कारखान्यासाठी खरेदी केलेली जमीन नियमबाह्य आपल्या आणि कुटुंबीयांच्या नावावर केल्याचं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलं आहे.


लोणीकर यांच्यावर शेतकऱ्यांची परतूर तालूक्यातील लोणी गावामधील 50 एक्कर जमीन चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने आपल्या घशात घातल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदार शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत आरोप केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या या तक्रारीकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी कानाडोळा केल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

लोणीकर यांनी 2000 साली आमदार असताना, परतूर आणि मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजारांच्या रकमा घेतल्या होत्या. त्याच्या शेतकऱ्यांना पावत्याही दिल्या. मात्र चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या नावाने शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्यावरील नोंदणी क्रमांक देखील बोगस असल्याचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. शिवाय ज्या शेअर्समधून कारखाना उभा केला जाणार होता त्या चतुर्वेदेश्वर नावाच्या कारखान्याची साखर आयुक्तांकडे नोंदच नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.