औरंगाबाद : गरम भाजीत पडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. चिकलठाणा भागातील पुष्पक गार्डन परिसरात सोमवारी (24 जून) रात्री ही घटना घडली. हर्षल संतोष गाधू असं मृत मुलाचं नाव आहे.

हर्षल सोमवारी रात्री घरात खेळत होता तर आई घरकामात व्यस्त होती. यावेळी आईने रात्रीचं जेवण बनवून खाली ठेवलं होतं. मात्र खेळता खेळता हर्षलला अचानक चक्कर आली आणि तो गरम भाजीत पडला. यामध्ये त्याच्या चेहरा, डोक्याला गंभीर इजा झाली.

त्याला तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण आज उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.