Aurangabad Rain Update News: औरंगाबाद शहरात आणि ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुद्धा पाहायला मिळाला. तर सिल्लोड तालुक्यातील सावखेडा जवळील उटाडेवाडी शिवारात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. संजय नथ्थू उटाडे ( वय 40 वर्षे ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, संजय यांच्या शेतामध्ये कपाशीच्या लागवडीसाठी ठिंबक सिंचन करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी लवकर काम संपवावे म्हणून, संजय उटाडे खुद्द पाईप टाकण्याचे काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक वीज पडली. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.


औरंगाबादमध्ये दुसऱ्या दिवशी पाऊस...


मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असून मराठवाड्यात सुद्धा काही जिल्ह्यात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरासह ग्रामीण भागातील पैठण,सिल्लोड,औरंगाबाद तालुक्यात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सुरवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


कोणत्या तालुक्यात किती पाऊस... 


औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शहरात आणि ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडत आहे. औरंगाबाद तालुक्यात आतापर्यंत 15.2 मिलिमीटर पाऊस पडला असून, पैठणमध्ये 0.9, गंगापूर 14.1, वैजापूर 12.6,कन्नड 24.2, खुलताबाद 24.8, सिल्लोड 8.9, सोयगाव 01 आणि फुलंब्रीत सुद्धा 01 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.


हवामान खात्याच्या अंदाज


हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 जून रोजी, कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ विभागातील सर्वच जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा ( वा-याचा वेग ताशी 30-40 कि.मी. ) वाहण्याची शक्यता आहे. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत मध्य महाराष्ट्र विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता आहे.