चंद्रकांत खैरे जोपर्यंत औरंगाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली अभद्र युती तोडत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे.
अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा, तो नंतर घेता येईल, परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे, यासाठी औरंगाबादेती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड आक्रमक झाले होते. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद जिल्हा परिषद, औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत आहे.
खैरेंनी काल प्रचार कार्यालयाचं स्तंभ पूजन केलं. मात्र या कार्यक्रमाला भाजप नेते, कार्यकर्ते गैरहजर होते. त्यानंतर रात्री झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमातही भाजप कार्यकर्त्यांची अनुपस्थिती होती.
दुसरीकडे, जालन्यातही शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर युती झाली असली, तरी स्थानिक पातळीवरचा कडवटपणा दूर करण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे.