ओवैसी म्हणाले की, निजामाचे पैसे एका इंटरनॅशनल बँकेत होते. त्या पैशावर पाकिस्तानने दावा सांगितला होता. पण ते पैसे 450 करोड भारताला मिळाले, आम्ही आमचे पैसे सुद्धा देशाला देऊन गेलो, असे ओवैसी यावेळी म्हणाले. त्या 450 कोटी रुपयांत औरंगाबादच्या जनतेला पाण्याची सोय करा, असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, मला कधी मृत्यू आला तर या औरंगाबादच्या जमिनीवर यावा, इतकं मला हे शहर प्रिय आहे. इथे इम्तियाज यांचा विजय केवळ मुस्लीमांचा नाही, इथल्या प्रत्येक मतदारांचा विजय आहे. भारताच्या संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकाचा विजय आहे.
महात्मा गांधींना गोळी मारण्याच्या आधी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं, ते का तर गांधी म्हणाले मुस्लिमांवर अत्याचार बंद केले पाहिजेत. गांधीला मारणाऱ्यांना हिरो मानता आणि गांधीचं नाव घेता. जगाला धोका देण्यासाठी हे लोक गांधींचं नाव घेतात. महात्मा गांधींची दीडशेवी जयंती साजरी करता, मग गांधींचा संदेश का मान्य करत नाही, असा आरोप यावेळी ओवैसी यांनी केला.
2014 पासून 2018 पर्यंत महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करतात. मग कुठे मानता तुम्ही गांधी? तुम्ही गांधींच्या मार्गावर चालता की गोडसेच्या मार्गावर चालता हे मला आधी सांगा? गांधींचं नाव घेऊन तुम्ही तुमचं सत्तेचं दुकान चालवत आहात, असाही आरोप त्यांनी केला. ज्यांनी आम्हाला 70 वर्ष घरी बसवलं त्यांना आता घरी बसवायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
मुस्लिमांवर इतके अत्याचार होतात म्हणून मी इतकं कडक बोलतो. पण आताचे गोडसे गांधींच्या भारताला संपवत आहेत. त्यामुळे या देशाला वाचवा, त्या गोडसेने एका गांधीला तीन गोळ्या मारल्या आणि हे गोडसे रोज अनेक गोळ्या मारत आहेत. जे लोक भारताला गोडसेच्या विचारत बुडवत आहेत त्यांच्यापासून हा देश वाचवा, असेही ते म्हणाले.
उमेदवारी नाकारल्यामुळे सभेत गोंधळ
दरम्यान उमेदवारी नाकारल्यामुळे ओवैसी यांच्या सभेत काही वेळ गोंधळ झाला. एमआयएमचे जावेद कुरेशी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे हा गोंधळ झाला. कार्यकर्ते बॅरिकेट्स तोडून विंगमध्ये दाखल झाले होते.