औरंगाबाद : एकीकडे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्यानं थोडासा दिलासा मिळत आहे. मात्र दुसरीकडे राज्यात चिकनगुनिया आणि डेंग्यू आजाराचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यात एक दिलासादायक बाब म्हणजे मृतांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे. डेंगू आणि चिकनगुनियाचा महाराष्ट्रात कसा प्रादुर्भाव वाढला यावर एक नजर टाकुयात.


औरंगाबादसह बहुतेक सरकारी आणि खाजगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. औरंगाबादमध्ये शेकडो रुग्ण डेंग्यू आणि चिकनगुनिया यामुळे हैराण आहेत. औरंगाबाद आणि राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांनी भरली आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या मध्यावधीत राज्यात डेंग्यू पाय पसरत असतो. पाऊस एकदा स्थिरावला की साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूचा प्रसार वाढतो. मागच्या वर्षी या काळात कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती आणि डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु यावर्षी कोरोनाबरोबर डेंग्यूने आणि चिकनगुनिया आजाराने हातपाय पसरले आहेत.


राज्यात चिकनगुनिया आणि डेंग्यूची काय स्थिती आहे?



  • यावर्षी 16 ऑगस्टपर्यंत राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 2 हजार 554 होती. 

  • त्यानंतर आठवडाभराच्या आता म्हणजे 21 ऑगस्ट रोजी ही संख्या 4 हजार 997 झाली.

  • सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा कहर वाढत असून 7 सप्टेंबरपर्यंत राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 5 हजार 746 इतकी झाली. 

  • मागील वर्षात 3 हजार 356 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, तर 10 जणांचा मृत्यू झाला होता. 


यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच 5 हजार 746 रुग्णसंख्या झालीय. आत्तापर्यंत डेंग्यूमुळे राज्यात 11 जणांचा मृत्यू झालाय. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील सहा, तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झालाय. राज्यात चिकनगुनियाच्या संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. सध्या 1442 झाले आहेत. गेल्या वर्षी वर्षभरात चिकनगुनियाचे 782 रुग्ण आढळले होते. राज्यातील काही जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यात नागपूर, वर्धा, पुणे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, अमरावती, सोलापूर या जिल्ह्याचा समावेश आहे. 


ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रांमध्ये हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे आढळले आहे. घराघरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या महानगरपालिकेला 50 तर ग्रामीण आणि छोट्या नगरपालिकांमध्ये 25 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.