Chalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. अशातच आता औरंगाबाद-धुळे महामार्ग कन्नड चाळीसगाव घाटातील भयानक दृश्य समोर आली आहेत. या घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. तर एक गाडी घाटातून खाली कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातून वाचलेल्या लोकांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला आहे. 


अचानक गाड्यांवर दरड कोसळल्याचा आवाज झाला अन्..
या घाटातील काही गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत. एबीपी माझाचे प्रतिनिधी काही चालकांशी बोलले असता अंगावर शहारे येतील असा अनुभव त्यांनी सांगितला. प्रवास सुरु असताना अचानक दरड कोसळल्याचा आवाज झाला. गाड्यांवर मोठमोठे दगड कोसळू लागले. आता आपण काही वाचत नाही, असाच विचार मनात आला. काही कुटुंबं यातून कशी वाचली. काच फोडून लोकांना कसं वाचवण्यात आलं. एका गाडीत 18 लोकांनी रात्र कशी काढली? हे अनुभव ऐकून कोणाच्याही मनात भीती निर्माण होईल. संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतर आज दुपारी जीसीबी मदतीसाठी आले आहेत. एकाने सांगितलं की आमची सगळी अवस्था पाहून काही लोकांनी आम्हाला बिस्कीट पुडे दिले. 7 किलोमीटर चालल्यावर आणि सकाळपासून अन्नाचा कण नसताना या बिस्कीटाची चव काय सांगू? असे अनुभव या अपघातातून वाचलेल्या लोकं सांगत आहेत.


Chalisgaon Flood : चाळीसगावात पुरामुळं हाहा:कार; 800 जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती, 15 गावं पाण्याखाली


कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली 
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे.


कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. 


दरम्यान, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.