औरंगाबाद : हिंगोली वगळता मराठवाड्यात 100 टक्के दुष्काळी स्थिती असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयानं खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी नुकतीच जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील 8 हजार 530 गावांपैकी 7 हजार 281 गावांची पैसेवारी 50 पैशांहून कमी आहे. त्यात केवळ 1 हजार 252 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आहे. हिंगोली जिल्ह्यात मात्र सर्वच  गावांची पैसेवारी 50 पैस्यांपेक्षा जास्त आहे.


यावर्षी पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामातील उत्पादन निम्मे झाल्याची माहिती विभागीय आयुक्तांच्या अहवालातून मिळाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या गर्तेत अडकल्याचा अहवालही राज्य सरकारला पाठवला आला आहे.

विभागातील 421 मंडळापैकी 313 मंडळात 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाले आहे. त्यामुळे पिकांची आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात तब्बल सातशे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील सुमारे 48 लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित झाले आहे. त्यात मराठवाड्याला दुष्काळातून सावरण्यासाठी तीन हजार कोटींची गरज असल्याची माहितीही विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची नजर सरकारच्या मदतीकडे असणार आहे.

मराठवाड्यात पैसेवारीची स्थिती, 50 पैसे पेक्षा कमी असलेली गावं

औरंगाबाद- 1355

बीड -1402

जालना -970

परभणी- 772

हिंगोली -00

नांदेड -1094

लातूर -951

उस्मानाबाद -736