नागपूर : शनिवार 16 जुलैला कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा (Koradi Power Plant) सकाळी राख बंधारा फुटल्या नंतर रात्रभरात तातडीने पाणी विसर्ग बंद करण्यात यश आले. मात्र पावसामुळे वाढलेल्या पाणी पातळीमुळे सर्वत्र राख वाहून गेल्याने नागपुरात (Nagpur) पाण्याचा पुरवठा करणाऱ्या केंद्रांचे पंपही बंद करावे लागले होते. वीज केंद्राच्या दुर्लक्षामुळे झालेल्या ह्या घटनेमुळे मात्र परिसरातील गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अथक प्रयत्नानंतर राखीमिश्रीत पाण्याचा विसर्ग थांबविण्यात प्रशासनाला यश आले होते. सध्या  राख बंधाऱ्यातील तातडीचे/ अल्पकालीन नियोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे.


महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, डॉ.नितीन वाघ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व त्यानंतर प्रत्यक्ष राखेमुळे कन्हान नदीपर्यंत झालेल्या नुकसानाची पाहणी केली. 17 जुलैपासून परिसरातील बाधित व्यक्ती, प्राणी, शेतजमीन, नाले, विहिरी इत्यादींच्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. तसेच वीज केंद्राकडून प्राथमिक सर्व्हेक्षण/पाहणी मोहीम हाती घेण्यात आली.  या कामी महानिर्मितीने स्थानिक पातळीवर समिती गठीत करून ही कार्यवाही पूर्ण केली. बाधित नागरिक आणि स्थानिक सरपंचाच्या मागणीनुसार या गावात टँकरद्वारे तातडीने पाणी पुरवठा करण्यात आला आणि सोबतच परिसरात रोगराई पसरू नये याकरिता ब्लिचिंग पावडरचा छिडकाव करण्यात आला.


म्हसाला टोली वस्ती, रेल्वे लाइनच्या खाली बाधित नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार वीज केंद्रातर्फे जीवनावश्यक वस्तू तातडीने देण्यात आल्या. त्यामध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढे  गहू, तांदूळ, तूर डाळ, मिरची पावडर, हळद, जिरा, मोहरी, तेल पॉकेट्स, बिस्किट्स, साबण या आवश्यक अन्न पुरवठा करण्यात आला. तसेच बाधित नागरिकांच्या घरी पाणी गेल्याने प्रत्येक परिवाराला गादी, उशी, मुलांसाठी शाळेची पुस्तके आणि  गणवेश वाटप लवकरच करण्यात येत आहे.


कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या  मार्गदर्शनानुसार बाधित परिवाराला मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. खैरी ग्रामपंचायतचे सरपंच बंडू कापसे यांच्या खैरी गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचा गढूळ पाण्यामुळे उपसा करावे लागल्याने सुमारे पांच दिवस दोन वेळा पिण्याच्या पाण्याचे वॉटर टँकर महानिर्मितीकडून पुरविण्यात आले. म्हसाळा खसाळा रेल्वे पुलाखाली साठलेली राख काढण्यात आली. लवकरच रस्ता डागडुजी काम दोन दिवसांत सुरू होणार आहे. सुजाता सोनटक्के, तामलिंग मडावी, प्रल्हाद बडगुजर, इंदिरा भोयर, मोहम्मद गुलजार, मोहम्मद साबीत खान, संतोष समुद्रे,मुन्ना नदाब,संतोष परते, तौकिर अहमद,राजेश विश्वकर्मा, भाऊरावजी पाटील,प्रफुल्ल ठवकर, जहीर खान, रहमती अन्सारी इत्यादी बाधित परिवाराला अन्नधान्य वितरित करण्यात आले.