Asaduddin Owaisi : राम मंदिराबाबत लोकसभेत धन्यवाद प्रस्तावाबाबत चर्चा सुरु असताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ओवैसी यांनी "बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद", असे नारेही दिले आहेत. मोदी सरकार केवळ हिंदूत्वाचे सरकार आहे का? देशाला कोणताही धर्म नाही. मी बाबर, जिन्नांचा प्रवक्ता नाही. पण देशातील मुस्लिमांना तुम्ही काय संदेश देत आहात? असा सवाल ओवेसी यांनी लोकसभेत बोलताना केला आहे. 


असुदुद्दीन ओवेसी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 


अयोध्या आणि राम मंदिराबाबत बोलताना ओवैसी म्हणाले, "मोदी सरकार केवळ एका धर्माचे सरकार आहे का? 22 जानेवारीचे सेलिब्रेशन करत तुम्ही देशातील मुस्लिमांना कोणता संदेश देत आहात? हे सरकार एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळलाय, असा संदेश देऊ इच्छित आहे का? असा सवालही ओवैसी यांनी केला आहे. 1992, 2019 आणि 2022 मध्ये मुस्लिमांना धोका देण्यात आला आहे. 


'रामाचा आदर करतो पण नथूरामचा नाही' 


ओवैसी म्हणाले, 6 डिसेंबर 1992 रोजी देशात मोठा वाद झाला होता. युवकांना तुरुंगात डांबण्यात आले आणि म्हातारे झाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. मी रामाचा आदर करतो, पण नथूरामबाबत माझ्या मनात राग आहे. कारण त्याने अशा व्यक्तीची हत्या केली, ज्यांचे शेवटचे शब्द 'हे राम' होते. मला बाबरबाबत का विचारता? सुभाषचंद्र बोस, नेहरु आणि आपल्या देशाबाबत मला विचारा, असेही ओवेसी यांनी म्हटले.  


'देशाला कोणताही धर्म नाही'


ओवेसी म्हणाले की, या देशाला कोणताही धर्म नाही, असे माझे मत आहे. 16 डिसेंबर 1992 रोजी याच लोकसभेत एका प्रस्तावादरम्यान बाबरी विध्वंसाबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले.


अमित शहांकडून सीएएबाबत पुन्हा एकदा भाष्य


दरम्यान, लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना भारतात पळून यायचे होते. तेव्हा काँग्रेसने सांगितले होते की, तुम्ही इथे या तुम्हाला देशाचे नागरिकत्व दिले जाईल. सीएएचा उद्देश धार्मिक छळाला सामोर जाणाऱ्या अल्पसंख्यांकाना नागरिकत्व देणे हाच आहे, असेही शाह यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Amit Shah On CAA: लोकसभा निवडणुकीआधी देशात CAA कायदा लागू करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा