नागपूरः धातूचे दर वाढल्याने टाळाचे दर वाढले आहेत. चामडे तसेच लाकूड उत्तर प्रदेश, गुजराज व तामिळनाडूमधून आणावे लागते. इंधन दरवाढीमुळे मृदंगाचे दरही वाढले आहेत. त्यामुळे यावर्षी टाळ खरेदी करताना आणि मृदंगावर नव्याने शाई लावतानाही जरा अधिकचे पैसे मोजावे लागले. टाळेबंदीनंतर मृदंगासह विविध वाद्यांची निर्मिती व दुरुस्ती करणाऱ्यांसाठी ही वारी जराशी नफा देणारी आहे. कारण एका टाळाची किंमत 550 रुपयांपर्यंत वाढली, तर साडेपाच हजार रुपयांपासून मिळणारे मृदंग आता दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत.


वारीला जाण्यापूर्वी तसेच हरिनाम सप्ताहाची तयारी सुरू होण्यापूर्वी वाद्य निर्मिती करणाऱ्यांची घाई सुरू असते. मोठ्या शहरातील बहुतांश शाळांमध्येही स्वतंत्र संगीत विभाग आहे. शहरात 300 ते 350 हून अधिक तबल्याचे शिकवणी वर्ग आहेत. वारी, स्वातंत्र्यदिनाच्या तयारीचा भाग म्हणून जुलैमध्ये मृदंग, टाळ याच बरोबर विविध वाद्यांच्या दुरुस्तीचा काळ सुरू होतो. शहरात या व्यवसायातील मुकुंद बावने म्हणाले, आता वारीचे काम संपले आहे. कोरोनानंतर अनेक वस्तूंचे भाव वाढले तसेच टाळ व मृदंगांचेही दर वाढले आहेत. यावर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिरसातील वारीमध्येही महागाईची झळ बसत आहे. या वर्षी दररोज एक नवा आणि पाच जुन्या मृदंगाचे काम करावे लागत असल्याचे वाद्य निर्मिती व दुरुस्ती क्षेत्रातील कलाकार सांगत आहेत.


दोन वर्षांनंतर वाढली वर्दळ


मस्कासाथ आणि भारत माता चौकात टाळ तयार करणाऱ्यांसह मृदंग, तबला तयार करणाऱ्यांची दुकाने आहेत. सलग दोन वर्षानंतर ग्राहकांची वर्दळ वाढलेली आहे. सलग दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने सर्वच धार्मिक कार्यक्रमांवर बंद होती. परिणामी, आमचा व्यवसायही डबघाईस आला होता. आता व्यवसायाला चांगले दिवस आले असताना कच्च्या मालाचे दर वाढले आहे. त्यामुळे ग्राहकांनी नवीन टाळ, मृदंग खरेदी करण्याऐवजी जुन्याच टाळांवर यंदाचे वर्ष काढण्याचा तयारीत आहे. शहरातील वारीवर जाणाऱ्यांनी टाळ दुरुस्ती आथा संपली आहे. सध्या धापेवाड्याला होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंघाने कामे करण्यात येत आहेत. तसेच 30 तारखेनंतर श्रावण महिना सुरु होत असून त्यातही व्यवसायाची चांगली संधी आहे.