हैदराबाद : इक्रिसॅटच्या हॅक फॉर फार्मिंग या माहिती तंत्रज्ञान परिषदेत काही तंत्रज्ञांनानी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशा मोबाईल अॅपची निर्मिती केलीय. हे अॅप बनवणाऱ्या तंत्रज्ञांना या परिषदेत दोन हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय रूपयांत एक लाख 33 हजार रूपयांचं बक्षीसही देण्यात आलं.


 

लहान लहान शेतकऱ्यांना 35 ते 45 किमीच्या परीघात त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालासाठी योग्य ग्राहक आणि योग्य दराचीही माहिती देणारं हे अॅप आहे. थोडक्यात उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील मध्यस्थ कमी करणारं आणि ग्राहकांना शेतकऱ्यांच्या जवळ आणणारं हे अॅप आहे.

 

हैदराबादच्या इक्रिसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटबंधीय पीक संशोधन संस्थेने मायक्रोसॉफ्ट आणि तेलंगणा सरकारच्या टी-हब इन्क्युबेटर आणि अमेरिकेच्या अव्हेअर (aWhere) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील काही निवडक संगणक तंत्रज्ञ आणि प्रोग्रामर्ससाठी ही हॅकेथॉन परिषद आयोजित केली होती.

 

या हॅकेथॉनमध्ये प्रत्येकी आठ सदस्य असलेल्या 11 संघांनी सहभाग नोंदवला. या सर्वांना लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशी मोबाईल अॅप्स किंवा माहिती-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म्स बनवण्यासाठी सांगण्यात आलं होतं.

 

खास शेतीसाठी असे मोबाईल अॅप किंवा माहिती तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म विकसित केले तर लहान लहान शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.. तसंच त्याचं शोषणही कमी होईल, असा विचार त्या मागे होता.

 

इक्रिसॅटने आयोजित केलेल्या या हॅकेथॉनमध्ये डेअर (DARe-Digital Agri. Rural eMarketing)  या टीमने बनवलेल्या अॅपला पहिलं पारितोषिक देण्यात आलं. या टीममध्ये इक्रिसॅटमधील सहा संशोधक आणि मायक्रोसॉफ्टच्या दोन तंत्रज्ञानांचा सहभाग होता.

 

इक्रिसॅटच्या हॅकेथॉनला तंत्रसहाय्य पुरवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (संशोधन आणि विकास) अनिल भन्साली यांनीही या उपक्रमाचं कौतुक केलं. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान ही क्षेत्रं जवळ आली तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे खूप कार्यक्रम राबवता येतील. असं मत त्यांनी व्यक्त केलं.

 

शेती आणि आयटी यांच्या फ्युजनमुळे तरूणांना शेती व्यवसायाकडे आकर्षिक करता येईल, असं मत इकरीसॅटचे महासंचालक डेव्हि़ड वर्गविन्सन यांनी व्यक्त केलं.