नवी दिल्ली : एका रिपोर्टनुसार, देशातील दर 10 लाखामागे 250 नोटा नकली असल्याचे समोर आले आहे. देशात आजच्या घडीला एकूण 400 कोटी रुपयांच्या नकली नोटा आहेत. नकली नोटांच्या एका अभ्यासातून ही माहिती उघड झाली आहे.
भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी 70 कोटी रुपयांच्या नकली नोटा आणल्या जातात. भारतीय सांख्यिकी संस्थेने (आयएसआय) हा अभ्यास केला आहे.
आर्थिक दहशतवादाशी लढायचं असल्यास कठोप पावलं उचलायला केंद्रानेही सुरुवात केली आहे. यामध्ये एनआयएला सीबीआय, आयबी, डीआयआय, रॉ आणि राज्य पोलिसांच्या विभागांची सोबत आहे.
आजच्या घडीला जवळपास 50 टक्के हजार रुपयांच्या नकली नोटा आहेत. विशेष म्हणजे 100 आणि 500 च्या नकली नोटांच्या प्रमाण 1000 च्या नकली नोटांपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.
भारतीय सांख्यिकीचा अभ्यास बँकिंग क्षेत्रातील रोख रकमेच्या देवणा-घेवणीवर आधारित आहे.
बँकांना अधिक प्रमाणात नकली नोटा सापडतात. या अभ्यासानुसार, अजूनही बाजारात अनेक नकली नोटा असतील. नकली नोटा शोधण्याची मोहीम आणखी वेगवान केली पाहिजे, असेही अभ्यासातून सूचना देण्यात आली आहे.