Anjali Damaniya On Santosh Deshmukh Case: बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी वाल्मिक कराडच्या आईने केली आहे. वाल्मिक कराडच्या आईच्या आंदोलनावर अंजली दमानिया यांनी सवाल उपस्थित केले आहेत.
अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
वाल्मिक कराड यांच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार...आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात ह्याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलावर असलेल्या आरोपांची यादी मी पाठवत आहे. आपण पहावी ही विनंती. त्यांच्यावर ह्याच गुन्ह्यात झालेला FIR देखील आपण पहावा. आपल्याला काही प्रश्न
1. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
2. आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
3. आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का ?
4. संतोष मुंडे ह्याच्या क्रूर हत्येनंतर त्यांचा पत्नीने वाल्मिक कराड यांचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का ?
5. आवादा कंपनीचे लोक ह्यानी केलेला FIR खोटा आहे का ?
6. गोट्या गित्ते सारखी माणस सदगृहस्त आहेत का ?
एक आई म्हणून आपल्या मुलाबद्दल प्रेम असणे योग्य आहे, पण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही. त्यामागचे वास्तव आपण बघा ही विनंती. ‘वास्तव’ ह्या पिक्चर आपण बघा. एक वाया गेलेल्या मुलाला, आईने काय करायला हवं, ते आपण पाहा...संतोष देशमुख हे देखील कोणाचे पाती, वडील व भाऊ होते. त्यांना न्याय मिळायला हवा की नाही?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक
तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिक कराडच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. अशातच आता परळीत वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले आहे. परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर हे समर्थक चढले असून या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. परळीत दोन ठिकाणी कराड समर्थकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात कराड विरुद्ध देशमुख असा वाद रंगण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
वाल्मिक कराड समर्थकांचं टॉवर आंदोलन, आईंचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, VIDEO:
संबंधित बातमी:
दोन घडामोडींमुळे शंकेची पाल चुकचुकली; अंजली दमानिया यांनी घटनाच सांगितली!