Anajli Damania Protest बीड: अंजली दमनिया (Anajli Damania Protest) यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. ठिय्या आंदोलन ऐवजी सत्य शोधक आंदोलन अंजली दमानियांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दररोज सकाळी दोन तास आंदोलनाला बसणार असल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितले आहे. बीडच्या लोकांनी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्या दहशतीविरोधातील पुरावे आणून द्यावेत असं आवाहन देखील अंजली दमानिया यांनी केले आहे. अजित पवारांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. पण ती पुन्हा परत करण्यात आली. महाराष्ट्रमध्ये सुरू झालेले गुन्हेगारीकरण थांबावं यासाठी हा लढा सुरु झाला आहे. धनंजय मुंडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मंत्रिमंडळात राहणे योग्य नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.


...म्हणून मी मोर्चात सहभागी झाले नाही- अंजली दमानिया


काल बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या विराट मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होत असल्याचे मला कळाले होते. तसेच जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे लोक मोर्चात होते. त्यामुळे मी सहभागी झाले नाही, असं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व लोक देखील त्याच प्रवृत्तीची आहे, त्यांची दादागिरी मोठी आहे. आमची छोटी पडते म्हणून ही लोकं लढताय का?, हे सर्व लोक स्वतःची पोळी भाजण्यासाठी लढत आहेत. मी जेव्हा खडसेंच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. तेव्हा म्हणाले की तुम्ही माळी समाजाच्या विरोधात आंदोलन करता. त्यामुळे असे बोलणे करणे बंद करा, मी जे बोलते ते खरं आहे की नाही हे सांगा...सगळीकडे मी एकटी पोहोचू शकणार नाही. तिथल्या जनतेने देखील आवाज उठवला पाहिजे. माझ्यासारख्या दोनशे तीनशे अंजली जन्माला आल्या तर हे लढे देता येतील, असंही अंजली दमानिया यांनी सांगितले. 


अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस


दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील  तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केलाय. यानंतर अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.