अमरावती : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 40 जागा द्याव्या, अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी आपल्याला 288 जागा लढवाव्या लागतील अशी भूमिका राज्य कार्यकारिणीने घेतली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आम्हाला किमान 12-12 जागा द्याव्या. सध्या आम्ही महायुतीत आहोत. मात्र, त्यांनी आम्हाला जागाच दिल्या नाहीत तर आम्हाला आमची तयारी करावी लागेल असेही महादेव जानकर यावेळी बोलताना म्हणाले.


या आधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय समाज पक्षही स्वबळाची भाषा करत आहेत. या दोन्ही पक्षांनी लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता. महादेव जानकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी लोकसभेतून निवडणूकही लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. 


या आधीही स्वबळाची भाषा


महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने या आधीही स्वबळाची भाषा केली होती. विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवून असं महादेव जानकर म्हणाले होते. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण सध्या तरी 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 


या आधीही महादेव जानकरांनी महायुतीकडून 50 जागांची मागणी केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे, महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार असा इशारा महादेव जानकर यांनी दिली होता. शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.


महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू


महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला या सूत्रानुसार 200 हून जागांचे वाटप झाल्याची माहिती आहे. ज्या जागा वादाच्या आहेत, ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक पक्षांचा दावा आहे त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा :