Bacchu Kadu On Mahayuti: प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज अमरावती विभागातील प्रहारची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी लोकसभेमध्ये महायुतीसोबत (Mahayuti)राहायचं की नाही याचा निर्णय आज बच्चू कडू घेणार आहेत. अमरावतीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची ठरणार असून या बैठकीकडे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


आजच्या या बैठकीत अमरावती विभागातील प्रहारचे जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोबतच लोकसभा निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत आज दुपारी 4 वाजता महत्त्वाचा निर्णय होणे अपेक्षित आहे.


महायुतीसोबत राहायचं की नाही याबाबत मांडणार भूमिका 


महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आपल्याला विश्वासात घेण्यात येत आहे की नाही, महायुतीबाबत आपली भूमिका काय असणार आहे, किंबहुना स्थानिक कार्यकर्त्यांना महायुतीत कुठेही विश्वासात घेण्यात येत नाहीये. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका काय, याबाबत राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विचारणा होत आहे. महायुतीमध्ये एक घटकपक्ष म्हणून जर साधी विचारणा होत नसताना केवळ मतदाराच्या भूमिकेत प्रहार बाबत खेळी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे आज या संदर्भात दुपारी चार वाजता विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आम्ही चर्चा करून आपली भूमिका आणि पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. 


.... तर महाराष्ट्रात मजबूत उमेदवार देऊ- बच्चू कडू


सध्या महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून आम्ही असू असे चित्र कुठेही दिसत नाही. मात्र, जिथे वेळ येईल तिथे योग्य उमेदवार मिळाल्यास आम्ही त्याबाबत विचार नक्की करू असे देखील बच्चू कडू म्हणाले. अमरावती व्यतिरिक्त ही महाराष्ट्रात चांगल्या उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे. सोबतच तिसरा पर्याय म्हणून एखादा चांगला मजबूत उमेदवार कुठल्या मतदारसंघात असेल तर त्याला देखील उमेदवारी देण्याबाबत आम्ही विचाराधीन असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले. अमरावती लोकसभा मतदार संघात खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाल्याची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार बच्चू कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, आजच्या बैठकीत याबाबत देखील आम्ही निर्णय घेणार आहोत. 


धमक्या देऊन प्रचार करण्यास भाग पाडलं जातंय


खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना धमकी देऊन प्रचार करण्यात येतो आहे. जिथं आमच्यासारख्या राजकीय पुढार्‍यांना धमकी देऊन प्रचारात उतरवण्यात येत असेल तर तिथे सामान्य नागरिकांच्या बद्दल त्यांच्या भावना काय असेल, हे यातून दिसून येत असल्याचे देखील बच्चू कडू म्हणाले.  प्रचारात उभे असताना तुमच्या नम्रतेपेक्षा तुम्ही धमकी देऊन तुम्हाला प्रचारात यावच लागेल अश्या धमक्या देण्यात येत आहे. याबाबत आम्ही काही करण्यापेक्षा जनताच त्यांना त्याचे उत्तर देईल, असे देखील बच्चू कडू म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या