अमरावती : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी अमृत महोत्सवी वर्षात ध्वजारोहण करून अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरमधील शहीद सुभेदार एन के खोब्रागडे वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद वीर भगतसिंग तथा एन के खोब्रागडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले. 


भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून शहीद झालेले अमरावती जिल्ह्यातील पहिले वीर एन के खोब्रागडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक आणि स्मृतीस्तंभ या ठिकाणी उभारण्यात आला. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून रिद्धपूरच्या ग्रामपंचायतीने वारंवार दुर्लक्षित केल्याची तक्रार विद्यार्थीवर्गाकडून करण्यात आली. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं.  


पाच वर्षांपूर्वी येथे मोफत वाचनालय आणि अभ्यासिका केंद्रची स्थापना गावातील काही होतकरू विद्यार्थ्यांनी केली. आता येथे 50 ते 60 विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी गावातून आणि आजूबाजूच्या खेड्यातून येतात. परंतु ग्रामपंचायतीकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी वर्गातून करण्यात येत आहे.  


स्मृतीस्तंभावर लाईटची मागणी
गेल्या दोन वर्षांपासून या स्मृतीस्तंभावर रात्री लाईट असावा याकरता अनेकदा अर्ज करण्यात आला. त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय. परिणामी विद्यार्थ्यांनी उपोषणाचा इशारा दिला असून लाईट लावला नाही तर विद्यार्थी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या: