Bacchu Kadu : अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. याचा शेतकऱ्यांच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. अनेकांची जमीन खरवडून गेली आहे तर काही ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अचलपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी केली आहे.
आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल
मुसळधार पावसामुळं अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी बच्चू कडू यांनी केली. यावेळी त्यांनी लवकरच नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन येत्या आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.
आम्ही इथे असताना कृषी मंत्र्यांची काय गरज
राज्यात कृषी मंत्री नसले तर आम्ही इथे आहोत. आम्ही असताना कृषी मंत्र्यांची काही गरज नसल्याचे बच्चू कडू म्हणाले. नुकसानीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आढावा घेत आहेत. एकाच दिवशी मोठा पाऊस आल्यानं ही स्थिती झाल्याचे ते म्हणाले. या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावलं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी देखील खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. फक्त अचलपूरच नाही तर संपूर्ण विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी करणार आहे. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे, त्यांना तत्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यानं खचून जाऊ नये, आम्ही तुमच्या पाठीशी
या संकटात शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे सरकारचं आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिल अशी खात्री असल्याचे बच्चू कडू म्हणाले. त्यामुलं कोणत्याही शेतकऱ्यानं खचून जाऊ नये. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अडचणी असल्यास आम्हाला सांगा, आम्ही मदतीला धावून येऊ असेही ते म्हणाले. मी माझ्या शेतात चार वेळा तूर पेरली पण चारही वेळ डुकरांनी ती खाऊन टाकल्याचे बच्चू कडू म्हणाले. ज्वारी जशी कमी झाली, तशी पेरणी देखील कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 10 दिवसात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळेल असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- अपक्षांना बदनाम करून चालणार नाही; महाविकास आघाडीचा गेम बिघडला कारण...: बच्चू कडू
- Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच, शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली, शेतकरी चिंतेत