Amravati Sheti Nuksan : अमरावती जिल्ह्यात (Amravati Rain) गुरुवारी दुपारी काही गावात ढगफुटी सदृश्य पाऊस (Amravati Cloudburst) झाला. जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. यामुळे चांदूरबाजार तालुक्यातील शिराळा, पुसदा, नांदुरा शेत शिवारात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीत पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, तुरीचे पीक पावसामुळे पाण्याखाली गेली आहेत. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ढगफुटीमुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. आता सरकारकडे शेतकऱ्यांनी मदतीची मागणी यावेळी केली जात आहे.
जुना प्रवासी निवारा कोसळून एकाचा मृत्यू
वाशिम-अमरावती महामार्गावर मंगरूळ तालुक्यातील धोत्रा गावातील जुना प्रवासी निवारा कोसळून एका व्यक्तीचा दबून मृत्यू झाला. जोरदार पावसामुळे हा जुना जीर्ण अवस्थेत असलेला प्रवासी निवारा पावसाने कोसळला. या घटनेमध्ये देमाजी ठोंबरे या व्यक्तीचा दबून मृत्यू झाल्याची माहीती कळतंय पोलीस प्रशासन आणि गावकरी घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास पोलीस करत आहे.
पाहा व्हिडीओ : अमरावतीत शेतजमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान
वीज पडून दोघांचा मृत्यू
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील दुर्दैवी घटना समोर आली आहे. निंबाच्या झाडाचा आश्रय घ्यायला गेलेल्या काका-पुतण्याचा घात झाला. चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथील एका शेतात शेतकरी आणि शेतमजुर शेतीचे काम करत असतांना विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. यावेळी शेतकरी सुनिल मोती भास्कर (वय 32), निलेश बजरंग भास्कर (वय 20) या दोघा काका-पुतण्याच्या अंगावर विज पडल्याने त्यांचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे.
आठ जण जखमी
शेतात काम करत असताना अचानक पाऊस सुरु झाल्याने शेतातील मजूर शेतातच असलेल्या लिंबाच्या झाडाचा आश्रय घेण्याकरीता गेले असता, यावेळी अचानक वीज पडल्याने सुनिल मोती भास्कर यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, निलेश बजरंग भास्कर याला उपचारासाठी टेम्बुरसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असता, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शेतातच काम करणारे ललीता राजाराम जाम्बेकर (45), आरती सोमेश जाम्बेकर (20), पार्वती राजाराम भारकर (45), जानकी किशोर कास्टेकर (24), सविता चान्डेकर (28), होमपती मेटकर (55), बजरंग भास्कर (55), मिना बजरंग भास्कर (45) हे आठ जण जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :