Amravati News : विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने अमरावतीच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात (Monsoon Session 2023) जोरदार हल्लाबोल केला. 'रोजगार हमी योजनेच्या कामातील कुशल कामगारांचा निधी केवळ सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातच भरभरुन मिळतो. मात्र विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात हा निधीच मिळत नाही. हा प्रचंड दुजाभाव आहे. ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून त्यांना निधी मिळतो आणि आम्ही विरोधी पक्षाचे आमदार आहोत म्हणून आमचा निधी वितरीत होत नाही', असा हल्लाबोल आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या वेळेत बुधवारी सभागृहात केला.
यशोमती ठाकूर यांचा सभागृहात हल्लाबोल
रोजगार हमी योजनेच्या कामातील कुशल कामगाराचा निधी मिळत नसल्याचा मुद्दा आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आक्रमकपणे सभागृहात मांडला. यावेळी त्या म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघात भरभरुन हा निधी मिळतो. मात्र, आम्ही विरोधी बाकावर बसलो आहोत म्हणजे आम्हाला निधी द्यायचा नाही, हा कुठला न्याय आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करुन त्या म्हणाल्या की, सध्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पद्धतीने विरोधी पक्षाच्या आमदाराचा आवाज दडपण्यात येतो आहे, अशीच परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती, असंही त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याने आक्रमक
यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका करत म्हटलं की, या सरकारचा कारभार पाहता कुठे नेऊन ठेवला आहे, महाराष्ट्र माझा. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या पुढे म्हणाले की, रोजगार हमीच्या कुशल कामगाराच्या निधीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या खात्याचे मंत्री याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. त्यांना याबाबत काहीही माहिती नसते. मग या प्रश्नाचे उत्तर देणार कोण? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. तर, ऑनलाईन पद्धतीने निधी वितरीत होतो, हा सर्व बनाव आहे. केवळ टक्केवारीचा घोळ सुरु आहे. आता निधी वाटपातही टक्केवारी येत असेल तर यापेक्षा दुर्दैव असूच शकत नाही, अशी घणाघाती टिकाही त्यांनी यावेळी केली.
'अजितदादा तुम्ही सुद्धा…'
रोजगार हमी योजनेतील कुशल कामगारांचा निधी विरोधी पक्षाच्या आमदारांना मिळत नसल्याचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे मांडतांना ॲड. यशोमती ठाकूर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांना उद्देशून म्हणाल्या की, तुम्ही जेष्ठ मंत्री आहात, अर्थमंत्री म्हणून तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. किमान आपण तरी यात लक्ष घातल पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक आमदार असा पक्षपात होतो आहे. त्यामुळे. हा मुद्दा निकाली काढण्याच्या दृष्टीने आपण काही निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असल्याचं. त्या म्हणाल्या. असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हा निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :