Amravati News अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर (Amravati News) येथील स्वागत प्रवेशद्वार प्रकरणातील वादावर बौद्धबांधवांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतल्यानंतर तोडगा निघाला आहे. मात्र, जोपर्यंत लेखी पत्र मिळणार नाही तोपर्यंत अमरावती (Amravati) विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्र पांढरी खानमपूर येथील गावकऱ्यांनी घेतला आहे. 


लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा गावकऱ्यांचा निर्धार


पांढरी खानमपूर येथील स्‍वागत कमानीला 'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार' असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्धबांधवांनी केली होती. परंतु याला गावातील काही इतर समाजबांधवांनी विरोध दर्शविल्याने गावात दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्णम झाले होते. त्यानंतर गावातील हा वाद विकोपाला जाऊन गावात संचारबंदी लावण्यात आली होती. तसे असताना गावातील शेकडो ग्रामस्थांनी गाव सोडत थेट अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. त्यानंतर अमरावती विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेत आयुक्तांनी तीन दिवसांचा वेळ मागितला होता. 


अखेर काल, 9 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर आले असतांना, या प्रकरणी त्यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला. यावेळी दोन्ही गटातील शिष्ट मंडळासोबत बैठक घेऊन प्रवेशद्वारावर दोन महापुरुषांचे नाव देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. ही सूचना बौद्ध समाजाला मान्य आहे. मात्र, असे असतांना पालकमंत्री यांच्या सुचनेवर अजूनही जिल्हा प्रशासनाने लेखी पत्र दिले नसल्याने, आयुक्त कार्यालय समोर गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत लिखित पत्र आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत इथून आम्ही हलणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


गावाच्या प्रवेशद्वाराचा वाद विकोपाला


पांढरी खानमपूर ग्रामपंचायतीने 26 जानेवारी 2020 ला ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल, असा ठराव पारित झाला होता. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर 26 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा ठराव घेऊन प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही, असाही ठराव पारित करण्यात आला होता.


मात्र, बांधकाम सुरू होण्यापूर्वीच 31 जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावण्यात आले. त्याला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असता हा फलक 13 फेब्रुवारीला पोलीसांनी तो काढण्याचा प्रयत्न केला. याला गावातील शेकडो बौद्धबांधवांनी विरोध दर्शवत गावाच्या प्रवेशद्वारावरच आळी पाळीने ठिय्या आंदोलन सुरू केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या