Amravati News : नाफेडकडून हरभरा (Gram) खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरू झाली. मात्र सकाळी शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याने खरेदी नोंदणी बंद करण्यात आली. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले. एबीपी माझाच्या या बातमीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून (Devendra Fadnavis) दखल घेण्यात आली आहे. आता हरभरा खरेदीची ऑनलाईनसह ऑफलाईनही नोंदणी होणार आहे. नाफेडच्या अमरावतीतील (Amravati) केंद्रांवर झालेल्या गोंधळानंतर घोषणा करण्यात आली आहे. 


हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी कालपासून (26 फेब्रुवारी) रांगा लावल्या होत्या. आज (27 फेब्रुवारी) सकाळी नोंदणीसाठी कार्यालयाचं दार उघडताच शेतकऱ्यांची एकच झुंबड या ठिकाणी उडाली. सकाळी आठ वाजता एका शेतकरी गेटच्या आत जाणं अपेक्षित होतं. मात्र प्रवेश सुरु होताच एकच गोंधळ उडाला तब्बल एक हजार शेतकरी गेटच्या आत गेल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अखेर हरभरा नोंदणी बंद करावी लागली. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांची व्यथा दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि पणन सचिव यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या चना खरेदीची नोंदणी ऑफलाईन होणार आहे. 


गर्दी झाल्याने नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीची प्रक्रिया रद्द


शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील नाफेडच्या केंद्रावर चणा खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र, शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने ही प्रक्रिया बंद करण्यात आली. या केंद्रावर शेतकऱ्यांनी रविवारी दुपार पासूनच रांग लावायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी किमान दोन ते अडीच हजार शेतकरी उपस्थित होते. अपुरी व्यवस्था आणी पोलीस बंदोबस्त नसल्याने शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आणि गोंधळ उडाला. मागील वर्षी देखील शासनाने 4 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करुन प्रत्यक्षात मात्र अडीच हजार शेतकऱ्यांचा माल खरेदी केला. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आपला माल खुल्या बाजारात कवडीमोल दराने विकावा लागला. यावर्षी देखील अशीच परिस्थिती होऊ नये त्यासाठी आपला नंबर खरेदीसाठी लागावा या उद्देशाने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर गर्दी केली. 


शेतकऱ्यांच्या कालपासून रांगा


हरभऱ्याचा हमीभाव 5300 असल्याने शेतकऱ्यांनी कालपासूनच नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या. सध्या शेतकऱ्यांकडे हरभरा घरात पडून आहे बाजारात 4200 ते 4400 रुपये दर मिळत असल्याने सगळ्या शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे आहे. कारण नाफेडचे हमीभाव हे 5300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे. आज झालेल्या या संपूर्ण गोंधळात खरेदी विक्री संघाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांची गर्दी कालपासून होत असताना कुठलीच ठोस व्यवस्था याठिकाणी दिसून आली नाही. एकच गर्दी झाल्याने शेतकऱ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले. रात्रीपासून आलेले शेतकरी थंडीत रस्त्यावर झोपल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही शेतकरी तर खरेदी केंद्रावरच झोप घेत असल्याचे दिसून आले.