अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा जवळील बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रम शाळेतील 32 विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून या सर्व विद्यार्थीनींना अचलपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. 


परतवाडा बहिरम- बैतूल मार्गावरील पंचशील आदिवासी आश्रम शाळा येथे विद्यार्थीनीना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थीनींना अचानक पोटात दुखायला लागले. चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, ताप ही लक्षणे विद्यार्थ्यांना दिसू लागली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आदिवासी आश्रम शाळेतील मुलींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवारी 7:30  वाजताच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले.त्यातील एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आलं आहे. 


या विषबाधा घटनेमध्ये मुलींची संख्या एकूण 32 असून आठ मुलींची प्रकृती सुधारणाजनक असल्याचं सांगण्यात येतंय. या सर्वांना आता डिस्चार्ज देण्यात आला असून इतर 28 मुलींवर  उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचार सुरू आहेत. ही विषबाधा पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नातून झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विषबाधा नेमकी कशातून झाली हे चौकशी अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल.