HMPV Virus: जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) वेगाने पसरत आहे. ज्यामुळे रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होत आहे आणि चीनमधील स्मशानभूमीत जागा नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर एचएमपीव्ही व्हायरसने आता हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. हा विषाणू किती धोकादायक आहे यावर संशोधन सुरू आहे. मात्र, तो जगासाठी मोठा धोका बनू शकतो. यामुळेच भारतासह अनेक देश अलर्ट मोडवर आले आहेत. भारतात एचएमपीव्हीची व्हायरसची दोन जणांना लागण झाली आहे. 


चीननंतर या देशात आढळलेला पहिला कोरोना रुग्ण


चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर थायलंड हा पहिला देश होता जिथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा कोरोना व्हायरस इतर देशांमध्ये पोहोचला. जर  HMPV व्हायरस देखील असाच पद्धतीने पसरल्यास दक्षिण कोरिया, जपान, रशिया आणि अमेरिका या देशांना सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो. कारण या प्रमुख देशांमधील नागरिक मोठ्या प्रमाणात चीनमध्ये जात असतात. भारतासाठीही हा मोठा धोका ठरू शकतो. चीन हा शेजारी देश असल्याने भारतातूनही मोठ्या प्रमाणात लोक चीनमध्ये जात असतात.


कोरोना आजारासारखी दिसतात लक्षणे- 


एचएमपीव्हीच्या संसर्गात सर्दी आणि कोरोना आजारासारखी लक्षणे दिसतात. खोकला, ताप येतो, सर्दी होते. ह्यूमन मेटाप्रोन्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा मेटाप्रोन्युमोव्हायरस जीन्सचा आरएनए विषाणू आहे. त्याच्या बाधेमुळे लहान मुले आणि वृद्ध यांना सर्वांत जास्त त्रास होतो. या आजारांमुळे चिनी अधिकाऱ्यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास, मास्क घालण्यास व हात सॅनिटाईझ करण्यास सांगितले आहे. एचएमपीव्ही विषाणूमुळे झालेला संसर्ग बरा करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.


सावधान, HMPV व्हायरसपासून वाचण्यासाठी हे करा :


- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.


- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.


- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.


- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा


- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.


हे करू नये :


- हस्तांदोलन


- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर


- आजारी लोकांशी जवळचा संपर्क


- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे




संबंधित बातमी:


HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?