Akola News : अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या विवरा गावात काल संध्याकाळी एक खळबळजनक प्रकार घडला. या गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरुणाचा काल (26 ऑक्टोबर) संध्याकाळी मृत्यू झाला. मात्र, स्मशानात नेताना तो चक्क उठून बसल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला गावातल्या एका मंदिरात ठेवण्यात आलं. अन् तो बोलायला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी दिली. या तरुणाला पाहण्यासाठी गावात मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर गावात येत पोलिसांनी प्रशांतसह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. काही लोक याला दैवी चमत्कार समजत आहेत. तर काही लोक याला वैद्यकीय चूक समजत आहेत. प्रशांत हा होमगार्डमध्ये असून त्याच्या अंगात येत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. तो एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचंही गावकऱ्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात मोठं गूढ निर्माण झालं आहे. प्रशांत मरण पावल्याचा बनाव रचण्यात आला होता का? यात त्याच्या कुटुंबियांची भूमिका नेमकी काय आहे? गावात असलेल्या या प्रकरणात 'त्या' मांत्रिकाचा काय सहभाग आहे? याचा तपास पोलिसांना घ्यावा लागेल. 


काय आहे नेमकी घटना?
पातूर तालुक्यातील विवरा गावात काल संध्याकाळी मोठी नाट्यमय अन् गूढ घटना घडली. गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरुणाचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. मात्र, स्मशानात नेताना तो चक्क उठून बसल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला गावातल्या एका मंदिरात ठेवण्यात आलं. अन् तो बोलायला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी दिली. 'एबीपी माझ'ला मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत रामकृष्ण मेसरे हां युवक चान्नी पोलिसांत कार्यरत आहे. दरम्यान प्रशांत गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असं त्याच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांना सांगितलं. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला अंत्यविधीसाठी अकोला जिल्ह्यातील विवरा गावात आणले. काल रात्री सात वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यविधीची करण्याची तयारी सुरु झाली. प्रशांतला तिरडीवर बांधण्यात आलं. गावकऱ्यांसह नातेवाईक त्याला घेऊन अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाले. त्याच्यात काही हालचाली गावकऱ्याना दिसल्या. यावेळी त्या अंत्ययात्रेत असलेल्या एका तांत्रिकाने त्याला गावातल्या मंदिरात घेण्यास सांगितलं. आपण याला जिवंत करु असं सांगितलं. त्यानंतर प्रशांतला गावातील मंदिरात आणण्यात आलं. हे पाहण्यासाठी हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान काही कालावधीनंतर प्रशांत आणि महाराज दोघेही मंदिरातील खोलीतून बाहेर आले. यावेळी प्रशांत जिवंत होऊन चक्क लोकांशी बोलायला लागला होता. हे पाहून अनेकांना धक्का बसला.


'तो' तांत्रिक कोण?
गेल्या काही दिवसांपासून प्रशांत आजारी होता. त्याच्या अंगातही येत होतं. त्याच्या घरच्यांना त्याला भूतबाधा झाल्याचं तांत्रिकाने सांगितलं. यानंतर त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी येथे तांत्रिक उपचार सुरु केले. यासोबतच त्याच्यावर चिखलीतल्या एका डॉक्टरकडेही उपचार सुरु असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. काल प्रशांत मरण पावल्याचं कुटुंबियांनी गावकऱ्यांना सांगितलं. गावात त्याचा मृतदेह आणल्यावर अंत्यविधीच्या आधीच्या विधींवेळी गावकऱ्यांनाही बाहेर ठेवण्यात आलं. यानंतर त्याची अंत्ययात्रा सुरु झाली. अन् त्यानंतर पुढचं नाट्य घडलं. या नाट्यातच 'त्या' तांत्रिकाचीही एंट्री झाली. हे सारं नाट्य घडताना 'त्या' तांत्रिकाचा या प्रकरणात नेमका काय सहभाग? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्याच्या चौकशीतून या नाट्यातलं गुढ उकललं जाणार आहे. दरम्यान गावातील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक महाराज आणि प्रशांत हा सर्व बनाव असल्याचं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक महाराज हा 18 वर्षाचा असून मध्य प्रदेशमधील रहिवासी असल्याचा समजते.


प्रकरणाच्या मुळाशी अंधश्रद्धा आणि बनाव?
या संपूर्ण प्रकरणात अनेक गूढ आणि प्रश्न लपले आहेत. प्रशांत काही दिवसांपासून आजारी होता. प्रशांतला भूत-प्रेताची बाधा झाल्याचं त्याच्या संपर्कात आलेल्या एका तांत्रिकाने सांगितलं. यानंतर प्रशांतवर सैलानी येथे तांत्रिक उपचार सुरु झाले. प्रशांतला यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मृत्यूचा बनाव करावा लागेल, असा कट रचला गेल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे अन् त्यातूनच हा बनाव रचला गेल्याची शक्यता आहे. 


पोलिसांनी घेतली प्रशांतसह वडिलांना ताब्यात
काल रात्री हे संपूर्ण नाट्य रंगताना यात चान्नी पोलिसांची एंट्री झाली. गावातील मंदिरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी चान्नी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी प्रशांतसह वडील आणि 'त्या' तांत्रिक महाराजाची चौकशी सुरु केली. प्रशांतने हा मृत्यूचा कट का रचला, हा महाराज नेमका कोण आहे? या संदर्भात अधिक चौकशी सुरु आहे.