Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच (Swabhimani shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांचे सध्या अकोला कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहेत. बुलढाण्यातील (Buldana) आंदोलनावेळी तुपकरांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, तुपकरांच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने स्वीकारला आहे. न्यायालयानं आपलं म्हणणे सांगण्यासाठी सरकारी पक्षाला नोटीस पाठवली आहे. सरकारी पक्षानं जर नोटीसनुसार आपलं म्हणणं आज मांडलं तर जामीन अर्जावर उद्या (15 फेब्रुवारी) सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सरकारी पक्षाने जर आपलं म्हणणं आज न्यायालयासमोर मांडले नाही तर जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांना नायलायानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान रविकांत तुपकर हे अकोला कारागृहात असून ते अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन सुरु असल्यानं त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळत आहे.
रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनावर ठाम
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. रविकांत तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलवण्यात आले आहे. रविकांत तुपकरांनी तीन दिवसांपासून जेवण केलेले नाही, त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्न त्यांनी लावू धरले आहेत.
शनिवारी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झाला होता संघर्ष
गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरु होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. शनिवारी (11 फेब्रुवारी) तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. तुपकर पोलीसी वेशात येताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली. तुपकरांना आत्मदहनापासून रोखल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ते आंदोलनला बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या: