अकोला : पोलीस खातं म्हटलं की कठोरता, शिस्त आणि नियम यांची आठवण होते. परंतु या कठोर चौकटीत जर संवेदनशीलतेची, माणुसकीची झुळूक आली, तर ती एक नवी उमेद देते. अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नुकताच असाच एक हृदयस्पर्शी अनुभव घडवला. जो केवळ उपस्थितांच्या नव्हे, तर सोशल मीडियावर देखील अनेकांच्या मनाला भिडला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयात काल एक सेवापूर्ती सत्कार सोहळा पार पडला. सहा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा गौरव करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे कार्यक्रम नेहमीच औपचारिकतेने होतात. पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्हं, आणि भाषणं.... पण या वेळेसचा हा कार्यक्रम आणि त्यातील क्षण काहीसे वेगळा ठरलेत.
Akola Police News : अंगावर वर्दी अन् बुलेट... मुलीने सांगितले वडिलांचे स्वप्न
कार्यक्रमादरम्यान, सेवानिवृत्त होत असलेले अरूण उपर्वट आणि अरूण घोरमोडे हे दोन्ही 'माजी' होऊ घातलेल्या पोलीस अंमलदार आपल्या सेवेच्या आठवणी सांगत होते. त्यांच्याबरोबर आलेल्या अरूण घोरमोडे यांच्या मुलीने अत्यंत सहजपणे एक गोष्ट सांगितली. "पोलीस ड्रेस घालून बुलेटवर मिरवणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं, पण कौटुंबिक जबाबदारीने ते स्वप्नं कधी पूर्ण झालंच नाही." हे सांगत असतांना उपस्थितांचं मन अगदी गलबलून आलं. सभागृहात शांतता पसरली.
त्या मुलीची आपल्या बापाच्या संघर्षासंदर्भातली ती एक साधी आणि हळूवार टिप्पणी होती. परंतु त्यामागे दडलेली अपूर्णतेची सल अनेकांच्या मनाला भिडली. हे क्षण केवळ ऐकून दुर्लक्ष करता आले असते. पण पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या शब्दांमागची भावना ओळखली... आणि क्षणात निर्णय घेतला.
Akola SP Archit Chandak : बुलेट आणा... एसपींच्या सूचना
'बुलेट आणा', त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. काही क्षणातच सुरू झाला एका भावनिक क्षणांचा पट. हे दृष्य पाहतांना प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. सेवानिवृत्त पोलीस अंमलदार अरूण घोरमोडे पुन्हा एकदा पोलीस गणवेशात बुलेटवर बसले अन् त्यांच्या पाठीमागे बसले स्वतः पोलीस अधीक्षक अर्चित चांडक.
त्या पोलीस अंमलदाराच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधानाचं हसू. ते स्वप्न, जे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलं होतं, एका क्षणात साकार झालं. केवळ बुलेटवर बसवणं ही कृती नव्हती. ती होती सन्मानाची, माणुसकीची, संवेदनेची आणि कृतज्ञतेची अभिव्यक्ती.
हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात कायमचा कोरला गेला. सोशल मीडियावरही या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे 'संवेदनशील नेतृत्वाचं उत्तम उदाहरण' असल्याचं म्हटलं आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची ही एक छोटी कृती, अनेकांच्या मनात मोठा ठसा उमटवणारी ठरली आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचा सहज कृतीतून हृदयाला भिडणारा संदेश समाजाला दिला आहे. कधी कधी व्यवस्थेची कठोर चौकट, माणुसकीच्या एका स्पर्शाने मोडत नाही... तर तेजाने अधिक उजळून निघते हे अकोला पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या सहज आणि साध्या कृतीने स्पष्ट केले आहे.
Who Is Archit Chandak : कोण आहेत अर्चित चांडक?
आयपीएस अधिकारी अर्चित चांडक हे सध्या अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकाळ हा नवकल्पनाशील, संवेदनशील आणि कर्तव्यनिष्ठ नेतृत्वासाठी ओळखला जातो.
अर्चित चांडक यांनी IIT दिल्ली येथून 2016 मध्ये पदवी प्राप्त केली. 2018 च्या UPSC परीक्षेत यश मिळवून त्यांनी भारतीय पोलीस सेवेत (IPS) प्रवेश केला.
नागपूरमध्ये उल्लेखनीय कार्य :
नागपूर येथे उपपोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी वाहतूक व्यवस्थापनात अनेक नवकल्पनांचा अवलंब केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, शहरातील वाहतूक सुधारण्यात आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. त्यांनी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या सहभागाने वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित केले.
कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तप्रियता :
अलीकडेच, अकोला येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) एका सरकारी डॉक्टरशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची गंभीर दखल घेत, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला तत्काळ निलंबित केले आणि विभागीय चौकशी सुरू केली. त्यांच्या या तात्काळ कारवाईने पोलीस खात्यातील शिस्त आणि पारदर्शकतेचा आदर्श प्रस्थापित केला.